मालेगावी पोलीस बंदोबस्तात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:12 IST2017-09-02T00:11:48+5:302017-09-02T00:12:16+5:30
गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व शनिवारी साजरी होत असलेल्या बकरी ईद सणाची येथील स्थानिक प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक घेतली.

मालेगावी पोलीस बंदोबस्तात वाढ
मालेगाव : गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व शनिवारी साजरी होत असलेल्या बकरी ईद सणाची येथील स्थानिक प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक घेतली. तसेच उपाययोजनांबाबत सूचना केल्यात.
शहरात बकरी ईद व गणेश विसर्जन एकाच वेळी येत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाची धावपळ झाली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा पोलीस प्रमुख दराडे, प्रांताधिकारी अजय मोरे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी, मनपा आयुक्त संगीता धायगुडे, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, शशिकांत शिंदे, उपायुक्त कमरुद्दीन शेख, शहर अभियंता कैलास बच्छाव आदींसह वरिष्ठ अधिकाºयांची येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी बकरी ईद व गणेश विसर्जनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मोठ्या उंचीच्या गणेशमूर्ती गणेशकुंडात विसर्जित करण्यासाठी क्रेनचा वापर करावा अशा सूचना केल्या. तसेच मिरवणूक काळात वीजपुरवठा अखंडित राहावा याबाबतच्या सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना करण्यात आल्या. शनिवारी साजरी होत असलेल्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात १४ ठिकाणी तात्पुरते व एक कायमस्वरूपी अशा १५ कत्तलखान्यांची उभारणी करण्यात आली आहे. जनावरांची तपासणी करण्यासाठी २६ पशुवैद्यकीय अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. उत्सव काळात शहरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाºयांनी केली आहे. बकरी ईद व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. बाहेरगावाहून अतिरिक्त पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्ताबरोबरच बॉम्बशोधक पथक, वॉटरकॅन, शीघ्र कृतिदल, मोबाइल सीसीटीव्ही कॅमेरे असलेले वाहन परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहे. शहरातील पोलीस कवायत मैदानासह बारा इदगाह मैदानावर व प्रार्थना स्थळांमध्ये बकरी ईदची नमाज व दुवापठण केली जाणार आहे.