आरोग्य कर्मचारी मुख्यालयी नसल्याने गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 00:54 IST2021-03-20T21:14:07+5:302021-03-21T00:54:01+5:30
सायखेडा : गोदाकाठ भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र येथे कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी कोविड सारख्या महामारीच्या संकटात मुख्यालयी रहात ...

आरोग्य कर्मचारी मुख्यालयी नसल्याने गैरसोय
सायखेडा : गोदाकाठ भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र येथे कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी कोविड सारख्या महामारीच्या संकटात मुख्यालयी रहात नाही. अनेक कर्मचारी नाशिकहून ये जा करत असल्यामुळे सायंकाळी पेशंट तपासणी करण्यासाठी गेले असता आरोग्य केंद्र बंद असते त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने कठीण काळ सुरु आहे, अशा परिस्थितीत किमान मुख्यालयी रहावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गोदाकाठ भागात चांदोरी, सायखेडा, म्हाळसाकोरे, भेंडाळी या गावात आरोग्य उपकेंद्र आहे, यापैकी भेंडाळी आणि चांदोरी या गावातील जिल्हा परिषद सदस्य आहे. सदस्य या गावातील असूनही त्या गावातील कर्मचारी मुख्यालयी रहात नाही, सदस्य यांच्या गावात अशी परिस्थिती तर इतर आरोग्य केंद्रात काय परिस्थिती असेल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात मुख्य आरोग्यसेविका, असिस्टंट डॉक्टर, आणि एक नर्स असे कर्मचारी कार्यरत आहेत. यातील बरेच कर्मचारी सकाळी दहा वाजता मुख्यालयी येतात आणि सायंकाळी सहा वाजेनंतर निघून जातात. सद्या कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या काळात ग्रामीण भागात रात्री अपरात्री साधारण ताप, सर्दी, खोकला आणि इतर समस्या निर्माण होऊ शकतो. अशा पेशंटचा तात्काळ रिपोर्ट करणे गरजेचा आहे, मात्र कार्यालयात कर्मचारीच नसल्याने समस्या कोणाला सांगणार असा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. त्यामुळे किमान कोविडचा प्रादुर्भाव सुरु असल्यामुळे कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून नागरिकांना तात्काळ सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली जात आहे.
आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र येथे सायंकाळी नागरिक तपासणीसाठी किंवा औषध घेण्यासाठी गेले असता दवाखाना बंद आढळून येतो, कर्मचारी मुख्यालयी रहात नाही कोविड सारख्या महामारीच्या काळात आरोग्य विभाग सतर्क असला तरी ग्रामीण भागात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे, जिल्हा परिषद सदस्य यांच्या गावातील कर्मचारी मुख्यालयी रहात नाही हे दुर्दैव आहे.
- नितीन सातपुते, ग्रामस्थ, भेंडाळी.