नाशिकच्या वनक्षेत्रात ४६ हातपंप असलेले पाणवठे भागवताहेत वन्यप्राण्यांसह मानवाची तहान

By अझहर शेख | Published: April 17, 2024 04:40 PM2024-04-17T16:40:38+5:302024-04-17T16:41:44+5:30

उन्हाच्या झळा अत्यंत तीव्र झाल्या असून वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे जंगलांमध्ये असलेल्या वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

in the forest area of nashik 46 hand pumps quench the thirst of humans as well as wild animals | नाशिकच्या वनक्षेत्रात ४६ हातपंप असलेले पाणवठे भागवताहेत वन्यप्राण्यांसह मानवाची तहान

नाशिकच्या वनक्षेत्रात ४६ हातपंप असलेले पाणवठे भागवताहेत वन्यप्राण्यांसह मानवाची तहान

अझहर शेख, नाशिक : उन्हाच्या झळा अत्यंत तीव्र झाल्या असून वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे जंगलांमध्ये असलेल्या वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यामुळे वन्यप्राणी लोकवस्तीकडे भरकटण्याचा धोका असतो. वन्यजीवांची भटकंती कमी व्हावी, यासाठी नाशिक पश्चिम वनविभागातील आठ वनपरिक्षेत्रांमध्ये ४६ पाणवठ्यांची उभारणी गेल्या वर्षभरापासून करण्यात येत होती. हे पाणवठे यंदाच्या उन्हाळ्यात आजूबाजूच्या आदिवासी पाडे, गावांमधील लोकांसह वन्यप्राण्यांची तहान भागवत आहेत.

कॅम्पा योजनेतून तयार करण्यात आलेल्या या पाणवठ्यांभोवती हातपंपसुद्धा वनविभागाने बसविले आहेत.
नाशिक जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्या चांगली आढळून येते. आदिवासी भागातील तालुक्यांमध्ये वन्यप्राण्यांची जैवविविधता बघावयास मिळते. उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या भेडसावते. नागरिकांना जसा पाणीटंचाईचा सामना ग्रामीण भागात करावा लागतो, तसाच वन्यप्राण्यांनाही करावा लागतो. यामुळे मागील वर्षी पश्चिम वनविभागाने नाशिक, पेठ, बाऱ्हे, इगतपुरी, सिन्नर, हरसूल, त्र्यंबकेश्वर, ननाशी या वनपरिक्षेत्रांमध्ये कॅम्पा योजनेतून नवे पाणवठे जंगलांच्याजवळ उभारले आहेत. या पाणवठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याभोवती बोअरवेल्स करून हातपंपसुद्धा बसविण्यात आले आहेत. जेणेकरून पाणवठ्यांमध्ये पाणीदेखील वनरक्षक, वनमजुरांना सहजरित्या भरता येते. तसेच नागरिकांनाही या हातपंपाद्वारे पाण्याची गरज भागविता येते.

चांदवड, येवला भागात वन्यप्राण्यांना मुबलक पाणी-

पूर्व वनविभागातील येवला वनपरिक्षेत्रात असलेले ममदापूर काळवीट संवर्धन राखीव वनक्षेत्र काळवीट, नीलगाय, लांडगा, कोल्हा, खोकड, तरस आदी वन्यप्राण्यांसाठी ओळखले जाते. तसेच चांदवड वनपरिक्षेत्रातील वडाळीभोईजवळील गोहरण गावाच्या शिवारात सुमारे शंभर ते दीडशे हेक्टर गवतीमाळ वनक्षेत्रसुद्धा काळविटांच्या अधिवासाकरिता प्रसिद्ध आहे. कॅम्पा योजनेतून वरील दोन्ही ठिकाणी पोषक अशा विविध प्रजातीच्या गवताची लागवड करण्यात आल्याने काळवीटसारख्या तृणभक्षी वन्यप्राण्यांची भूक भागत आहेत. या भागातही पाणवठे उभारण्यात आले आहेत.

गोहरण क्षेत्रात जागोजागी सिमेंटच्या मोठ्या कुंड्या ठेवून त्यामध्ये पाणी भरले जाते. तसेच एक मोठा नैसर्गिक पाणवठा असून त्यामध्ये टँकरद्वारे पाणी आणून वनविभागाकडून टाकले जाते. ममदापूर संवर्धन क्षेत्रात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सुमारे १५ कुपनलिका असून त्याद्वारे १८ पाणवठे भरले जातात. वनक्षेत्रात नैसर्गिक १५ जलस्रोतदेखील आहेत.

Web Title: in the forest area of nashik 46 hand pumps quench the thirst of humans as well as wild animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.