संजय पाठक
नाशिक- जिल्ह्यातील शिंदे सेनेतील गटबाजी कमी होत नसून आता हा वाद कामगार सेनेपर्यंत पोहोचला आहे. पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिवकर्मचारी सेना सुरू झाल्या असतानाच आता पक्षाचे महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे अध्यक्ष जेरीभाई डेव्हीड यांनी नाशिकमध्ये येऊन दोनच अधिकृत संघटना असल्याचे सांगितले. त्यात शिवकर्मचारी सेना नसल्याचे स्पष्ट केल्याने संघटनात्मक वाद वाढण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यात शिंदे सेनेत दाेन गट अगाेदरच उघड झाले आहेत. त्यात पक्षाच्या कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष येऊनही एका गटाने दांडी मारली. यावेळी जेरीभाई डेव्हीड यांनी शिवसेना राष्ट्रीय कामगार सेना आणि महाराष्ट्र राज्य कामगार सेना या दोनच अधिकृत संघटना असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी शिवकर्मचारी सेना स्थापन केली आहे. भाजप, उद्धव सेना मार्गे शिंदे सेनेत दाखल झालेले विक्रम नागरे यांना चौधरी यांनी प्रदेश सरचिटणीस पद दिले आहे. त्या माध्यमातून नाशिकच्या कारखान्यात दाेन शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत. असे असताना जेरीभाई डेव्हीड यांनी मात्र दोनच अधिकृत संघटना घोषित केल्या आहेत.