म्हाळदे वीज उपकेंद्रात अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना कार्यालयात डांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 01:15 IST2022-03-03T01:14:34+5:302022-03-03T01:15:04+5:30
मालेगाव शहरालगतच्या म्हाळदे, सवंदगाव, सायने, गिगाव, म्हालणगाव शिवारात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी भरण्यास अडचणी निर्माण होत होत्या. वीज वितरण कंपनीकडे वारंवार वीजपुरवठ्याची मागणी करूनही दखल घेतली गेली नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी म्हाळदे उपकेंद्रातील उपअभियंता राजेश शिवगण व वीज कर्मचाऱ्यांना उपकेंद्रात डांबले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जे. के. भामरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

म्हाळदे वीज उपकेंद्रात उपअभियंता राजेश शिवगण यांना डांबून वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जे. के. भामरे यांच्याशी चर्चा करताना शेतकरी.
मालेगाव : शहरालगतच्या म्हाळदे, सवंदगाव, सायने, गिगाव, म्हालणगाव शिवारात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी भरण्यास अडचणी निर्माण होत होत्या. वीज वितरण कंपनीकडे वारंवार वीजपुरवठ्याची मागणी करूनही दखल घेतली गेली नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी म्हाळदे उपकेंद्रातील उपअभियंता राजेश शिवगण व वीज कर्मचाऱ्यांना उपकेंद्रात डांबले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जे. के. भामरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सवंदगाव, म्हाळदे, सायने, गिगाव, म्हालणगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू होता. या भागातील व्यावसायिकांना सुरळीत वीज पुरवठा केला जातो ; मात्र शेतीसाठी लागणाऱ्या वीजपुरवठ्यात भेदभाव केला जातो. परिणामी लागवड केलेल्या कांदे व फळ पिकांच्या पाण्याअभावी नुकसान होत आहे. कांदे करपू लागले आहेत. वीज वितरण कंपनीने सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती ; मात्र कंपनीकडून दखल घेण्यात आली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी उपअभियंता शिवगण यांना जाब विचारला असता त्यांनी शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा केली. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उपअभियंता शिवगण व कर्मचाऱ्यांना तब्बल दोन तास वीज उपकेंद्राच्या कार्यालयात डांबून ठेवले होते. या आंदोलनाची माहिती पवारवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. शेतकरी व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची मध्यस्थी केली ; मात्र संतप्त शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होते.
आंदोलनस्थळी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता भामरे यांनी धाव घेत परिसरात वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल. विजेच्या समस्येवर तोडगा काढला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात सचिन शेवाळे, लक्ष्मण शेवाळे, दिलीप अहिरे, मन्साराम पाटील, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, दीपक बच्छाव, आप्पा शेवाळे, प्रवीण शेवाळे, दादा शेवाळे आदींसह शेतकरी, वीज ग्राहक सहभागी झाले होते.