पोलीस बळ वाढविण्यासाठी उपाययोजना करणार
By Admin | Updated: July 4, 2017 23:44 IST2017-07-04T22:48:32+5:302017-07-04T23:44:19+5:30
सिन्नर : पोलीस बळ वाढविण्यासाठी उपाययोजना करणार असल्याची ग्वाही पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली.

पोलीस बळ वाढविण्यासाठी उपाययोजना करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : अपुरे पोलीस बळ ही सिन्नर तालुक्यातील तीनही पोलीस ठाण्यांची समस्या आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस बळ वाढविण्यासाठी उपाययोजना करणार असल्याची ग्वाही नाशिक ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली.
नाशिक ग्रामीण विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर सिन्नर शहर व तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सिन्नर पोलीस ठाण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधीक्षक दराडे बोलत होते. व्यासपीठावर आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, उदय सांगळे, तहसीलदार नितीन गवळी, नायब तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे, सिन्नरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, एमआयडीसीचे निरीक्षक हरिभाऊ कोल्हे, वावीचे सहाय्यक निरीक्षक रणजीत आंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सिन्नर शहरातील अंतर्गत वाहतुकीचे नियोजन करून तिला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. तालुक्यातील तीनही पोलीस ठाण्यांच्या भौगोलिक विभागणीत काही दोष असल्यास पुनर्रचनेतून त्याचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दराडे यांनी सांगितले. शहरात सार्वजनिक ठिकाणी गस्त घालण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
वाढत्या अपघाताबद्दल आमदार वाजे यांनी चिंता व्यक्त करून पोलिसांचा बराच वेळ त्यात खर्च होत असल्याचे सांगितले. बायपासमुळे अपघातांची संख्या कमी होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाशिकचे भूमिपुत्र व सिन्नरशीही संबंधित असल्याने पोलीस अधीक्षक आपुलकीच्या नात्याने सिन्नरकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा उदय सांगळे यांनी व्यक्त केली. पोलीस ठाण्याची भौगोलिक विभागणी करताना राहिलेल्या त्रुटीमुळे पोलिसांना व नागरिकांनाही त्रास होत असल्याचे सांगळे यांनी सांगून त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली. तत्पूर्वी, पोलीस ठाण्याच्या प्रांगणात पोलीस अधीक्षक दराडे, आमदार वाजे, नगराध्यक्ष डगळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नगरसेवक गोविंद लोखंडे यांनी शहरवासीयांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गटनेते हेमंत वाजे, भाजपाचे शहराध्यक्ष पंकज जाधव, अॅड. शिवाजी देशमुख, नगरसेवक सोमनाथ पावसे, पंकज मोरे, वासंती देशमुख, शीतल कानडी, प्रीती वायचळे, मालती भोळे, मल्लू पाबळे, सुहास गोजरे, रुपेश मुठे, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड, रामनाथ पावसे, बाळासाहेब पवार, उपस्थित होते. सहाय्यक निरीक्षक रणजीत आंधळे यांनी आभार मानले.