उत्पन्नवाढीसाठी व्हावी पर्यायी उपायांची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:59 AM2019-08-27T00:59:59+5:302019-08-27T01:00:26+5:30

कालिदास कलामंदिरात खानपान टाळण्याच्या उद्देशाने कंपन्यांचे गॅदरिंग, शालेय स्नेहसंमेलने, दिवसभराच्या व्यावसायिक कार्यशाळा बंद करण्यात आल्याने उत्पन्न बुडत आहे. तसेच कालिदासला लागूनच असलेले महात्मा फुले कलादालन, तर वर्षभरात तीन-चार कार्यक्रम वगळता वर्षभर बंद असल्याने त्यातूनदेखील उत्पन्न शून्य आहे.

 Implementation of alternative measures for growth | उत्पन्नवाढीसाठी व्हावी पर्यायी उपायांची अंमलबजावणी

उत्पन्नवाढीसाठी व्हावी पर्यायी उपायांची अंमलबजावणी

Next

नाशिक : कालिदास कलामंदिरात खानपान टाळण्याच्या उद्देशाने कंपन्यांचे गॅदरिंग, शालेय स्नेहसंमेलने, दिवसभराच्या व्यावसायिक कार्यशाळा बंद करण्यात आल्याने उत्पन्न बुडत आहे. तसेच कालिदासला लागूनच असलेले महात्मा फुले कलादालन, तर वर्षभरात तीन-चार कार्यक्रम वगळता वर्षभर बंद असल्याने त्यातूनदेखील उत्पन्न शून्य आहे. त्यामुळे या दोन्ही बाबींची व्यवस्थित सांगड घालत फुले कलादालनाचा कल्पक वापर केला, तर कालिदास कलामंदिराला आत्मनिर्भर करणे शक्य आहे.
कालिदास कलामंदिराला आत्मनिर्भर करण्यासाठी केवळ तेथील व्यावसायिक नाटकांवरच अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. मात्र, त्यासाठी महापालिकेला कालिदास आणि त्याशेजारील फुले कलादालनाचा कल्पक वापर करण्याची आवश्यकता आहे. गॅदरिंग, स्नेहसंमेलने, कार्यशाळांची खानपान व्यवस्था फुले कलादालनाखालील जागेत करून ते कार्यक्रमदेखील प्राइम टाइम नसलेल्या दुपारच्या सत्रांमध्ये घेण्यास कुणाचीच हरकत राहणार नाही. तसेच कालिदासचे उत्पन्नदेखील वाढू शकेल. महानगरातील सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या आणि कलाप्रेमी नागरिकांची भूक वाढत असताना फुले कलादालन वर्षभर जवळपास बंद अवस्थेत पडून राहणे कितपत योग्य आहे. महापालिकेच्या या कोट्यवधींच्या मिळकती अशा धूळ खात पडण्यापेक्षा त्यांचा समर्पक वापर करण्यासाठी कला क्षेत्राशी निगडीत मान्यवरांची आणि त्या विषयांवर काम करू इच्छिणाऱ्यांसह त्याकरिता वेळ देऊ शकणाऱ्यांची समिती गठीत करून त्यांच्या अहवाल आणि मार्गदर्शनानुसार अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.
सिनेनाट्यगृहाच्या पर्यायाचाही विचार व्हावा
एकीकडे कालिदाससारखे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण नाट्यगृह सकाळ आणि दुपारच्या दोन सत्रांमध्ये प्रामुख्याने रिकामेच असते. केवळ शनिवारी आणि रविवारच्या दोन दिवसांतच त्यात दोन किंवा तीन सत्रांमध्ये नाटके किंवा कार्यक्रम होतात, तर दुसरीकडे हल्ली सामान्य नागरिकाला मल्टिफ्लेक्समध्ये जाऊन एकेका तिकिटाला २५०-३०० रुपये याप्रमाणे कुटुंबासह सिनेमा बघण्यासाठी दीड हजार रुपये एकावेळी खर्च करणे परवडत नाही. मग अशा सामान्य नागरिकांसाठी १००-१५० रुपयांमध्ये चित्रपटांचे दोन शो सकाळी व दुपारच्या वेळेत ठेवले तरी अनेक बाबी शक्य होतील. मुंबई आणि ठाण्यात अशा प्रकारच्या पर्यायांवर विचारमंथन होत आहे. त्यासाठी व्यासपीठावर काही किरकोळ बदल तसेच मंजुरी घेण्यासह विशेष परवानग्या घेऊन मगच त्याची अंमलबजावणी करावी लागेल.

Web Title:  Implementation of alternative measures for growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.