औद्योगिक कामगारांना सुरक्षा कवच योजना लागू करण्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST2021-06-09T04:17:46+5:302021-06-09T04:17:46+5:30
सातपूर : कोरोना महामारीत फ्रन्टलाईन वर्करच्या बरोबरीने जिल्ह्यातील कामगार काम करत आहेत. या कामगारांची सुरक्षा रामभरोसे असून, कामगारांना सुरक्षा ...

औद्योगिक कामगारांना सुरक्षा कवच योजना लागू करण्याची
सातपूर : कोरोना महामारीत फ्रन्टलाईन वर्करच्या बरोबरीने जिल्ह्यातील कामगार काम करत आहेत. या कामगारांची सुरक्षा रामभरोसे असून, कामगारांना सुरक्षा कवच देण्यात यावे, अशी मागणी सिटूच्यावतीने कामगार उपायुक्त विकास माळी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांनी कारखाने सुरू ठेवून खूप मोठी जबाबदारी घेतली आहे. कंपनीत काम करत कामगारवर्गाने देशसेवाच केली आहे. आपला प्राण पणाला लावून फ्रन्टलाईन वर्करच्या बरोबरीने काम करत आहेत. मात्र, कामगारवर्गाला सुरक्षाकवच नाही. कामगारांना सुरक्षा कवच म्हणून कंपनी आवारात कामगारांसाठी मोफत कोरोना प्रतिबंधक लस मिळण्याची सोय करावी. सर्व कामगार, कर्मचारी यांना लॉकडाऊन काळात पूर्ण वेतन व कामावर असलेल्या कामगारांना अतिरिक्त रुपये १००० प्रतिदिन प्रोत्साहन भत्ता व्यवस्थापनाने द्यावा. कामगार कर्मचारी कोविड १९ या आजाराने बाधित झाल्यास हॉस्पिटलचा पूर्ण खर्च कंपन्यांनी करावा. कोविड आजारामुळे कंपनीतील कामगार किंवा कर्मचारी यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये मदत देण्यात यावी. सर्व कामगारांचा ५० लाखांचा विमा कंपनीने काढावा. त्या विम्याचा हप्ता केंद्र सरकार, राज्य सरकार व कंपनीने भरावा. यासह विविध मागण्यांचे निवेदन सिटूच्यावतीने सीताराम ठोंबरे, संतोष काकडे, भूषण सातळे, तुकाराम सोनजे, हिरामण तेलोरे, कल्पना शिंदे आदींनी कामगार उपायुक्त विकास माळी यांना देण्यात आले.
फोटो :- औद्योगिक कामगारांना सुरक्षा कवच योजना लागू करण्याच्या मागणीचे निवेदन कामगार उपायुक्त विकास माळी यांना देतांना सिटूचे सीताराम ठोंबरे, संतोष काकडे, भूषण सातळे, तुकाराम सोनजे, हिरामण तेलोरे, कल्पना शिंदे आदी.