नाशिक : देशातील बिघडलेली सामाजिक स्थिती बघता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. केवळ त्यांच्या बाबतीतील वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवणाऱ्या राजकारण्यांनी त्यांचे विचार अवगत करावेत, असे प्रतिपादन प्रा. गंगाधर अहिरे यांनी केले. श्रमिकनगर येथील फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित व्याख्यानपर कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना प्रा. अहिरे म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी १९५४ साली बहिष्कृत हितकारण सभा स्थापन करून त्यात ३० कलमांचा समावेश केला. यामध्ये देशाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय अशा सर्वच बाबींचा समावेश होता. त्यामुळेच देशातील प्रत्येक नागरिकाने डॉ. आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमराव पटेकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून समाधान तिवडे, सुधीर काळे, रोहित गांगुर्डे, अॅड. बनसोड, विजय गायकवाड, अशोक बनकर आदि उपस्थित होते. जगन्नाथ भरीत यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक चंद्रमणी इंगळे, तर संतोष पेंढारकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय भरीत, यशवंत भवरे, रूपराव तायडे, सतीश खिल्लारे, किशोर तायडे, मनोज पगारे, दामोदर गायकवाड, ईश्वर जाधव आदिंनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
आंबेडकरांचे विचार आत्मसात करा
By admin | Updated: December 6, 2015 22:11 IST