‘आयएमए’चा मिक्सोपॅथीला विरोध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:40 IST2020-12-11T04:40:30+5:302020-12-11T04:40:30+5:30
नाशिक : आयुर्वेद हे आपल्या देशातील शास्त्र असून, त्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. किंबहुना आयुर्वेदात अधिकाधिक संशोधन होण्याची आवश्यकता ...

‘आयएमए’चा मिक्सोपॅथीला विरोध !
नाशिक : आयुर्वेद हे आपल्या देशातील शास्त्र असून, त्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. किंबहुना आयुर्वेदात अधिकाधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे; मात्र त्याबाबत काहीही न करता अचानक आयुर्वेदाचाऱ्यांना ६८ शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याचा निर्णय सेंट्रल काैन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनकडून (सीसीआय) घेण्यात आला. अशा मिक्सोपॅथीला आमचा विरोध असल्यानेच आयएमएने शुक्रवारी एक दिवसाचा लाक्षणिक संपाचा निर्णय घेतला असल्याचे नाशिक आयएमएचे अध्यक्ष डाॅ. समीर चंद्रात्रे यांनी सांगितले. या संपातही आयएमएच्यावतीने इमर्जन्सी रुग्ण तसेच कोविड रुग्णांच्या उपचारांची सुविधा कायम ठेवली जाणार आहे; मात्र या निर्णयाला त्यांचा विरोध असल्याचे शासनाला समजावे, यासाठीच या लाक्षणिक संपाचे आयोजन करण्यात आले असल्याचेदेखील डॉ. चंद्रात्रे यांनी सांगितले. या संपाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
प्र. आयुर्वेदाच्या पदव्युत्तर पदवीधारकांना शस्त्रक्रियेबाबतची मान्यता देण्यास आयएमएचा विरोध का?
डॉ. चंद्रात्रे - आयुर्वेद ही स्वतंत्र प्रणाली असून, त्यांच्या अभ्यासक्रमात त्यांना मॉडर्न सायन्सबाबत तितकेसे सखोल ज्ञान दिले जात नाही. मान्यता दिलेल्या शस्त्रक्रियांसाठी त्यांचे पुरेसे प्रशिक्षणदेखील झालेले नसते. त्यामुळे अशी सरमिसळ केली जाऊ नये, इतकेच आमचे म्हणणे आहे.
प्र. आयुर्वेदासारख्या स्वदेशी पॅथीला या निर्णयामुळे चालना मिळणार असेल तर आक्षेप कशासाठी ?
डॉ. चंद्रात्रे - आयुर्वेदाला या निर्णयाने कोणताच फायदा होणार नसून, उलट विदेशांमध्ये ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिकच्या पदवीधारकांचे भिन्न महत्त्व उरणार नाही. आयुर्वेद करणाऱ्यांना पूर्णपणे शुद्ध आयुर्वेदाचे उपचार आणि शास्त्र अनुसरुन द्यावे तर मॉडर्न सायन्सला त्यांचे ॲलोपॅथीचे शास्त्र कायम ठेवू द्यावे. त्यात खिचडी करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये, दोघांचे स्पेशलायझेशन स्वतंत्र ठेवून त्या दोन्ही शास्त्रांना वाढण्याची संधी कायम ठेवायला हवी, असेच आमचे म्हणणे आहे.
प्र. या निर्णयाऐवजी मग सीसीआयने काय करायला हवे होते, असे तुम्हाला वाटते?
डॉ. चंद्रात्रे - आयुर्वेदाचा आम्ही आदरच करतो; पण त्यात अधिकाधिक संशोधन होण्याची आवश्यकता असून, या मूलभूत गोष्टींमध्ये सीसीआयने लक्ष घालण्याची आवश्यकता होती. किंवा मग आयुर्वेदाला स्वतंत्र ठेवून एखादा नवीन अभ्यासक्रम विकसित करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे शैक्षणिक प्रणालीचा मूळ ढाचा न बदलता सर्व पॅथींना स्वतंत्र ठेवून एकमेकांचा आदर राखून काम व्हायला हवे होते, असे मला वाटते.