आयएमए नाशिक : वैद्यकीय पेशावरील नाहक चिखलफेकीच्या व्यथा रंगमंचावर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:41 IST2018-02-11T22:37:15+5:302018-02-11T22:41:01+5:30
समाजाकडून विविध घटनांप्रसंगी डॉक्टरांना जबाबदार धरून दोषी ठरविणे, डॉक्टरांवर नाहक बिनबुडाचे आरोप करणे, रुग्ण दगावल्यास डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरविणे असे एक ना अनेक प्रश्न वैद्यकीय व्यवसायाला भेडसावत आहेत.

आयएमए नाशिक : वैद्यकीय पेशावरील नाहक चिखलफेकीच्या व्यथा रंगमंचावर...
नाशिक : समाजाकडून वैद्यकीय पेशावर होणा-या नाहक चिखलफेकीच्या व्यथा विनोदी संवादातून रंगमंचावर सादर करत डॉक्टरांना भेडसावत असलेल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न डॉक्टर कलावंतांकडूनच ‘डॉक्टर मुलगा नको गं बाई’च्या प्रयोगातून करण्यात आला. कथानकाच्या विनोदी संवादाने उपस्थित पे्रक्षकांना लोटपोट तर केलेच; मात्र अंतर्मुख होण्यासही भाग पाडले.
निमित्त होते, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि.११) गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात डॉ. अनंत कडेठाणकर लिखित व दिग्दर्शित ‘डॉक्टर मुलगा नको गं बाई’ या भन्नाट विनोदी एकांकिके चा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
औरंगाबाद येथील आयएमए शाखेच्या डॉक्टर कलावंतांनी रंगमंचावर येऊन आपल्या पेशाला भेडसावणा-या विविध समस्या व प्रश्नांवर विनोदी संवादाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. समाजाकडून विविध घटनांप्रसंगी डॉक्टरांना जबाबदार धरून दोषी ठरविणे, डॉक्टरांवर नाहक बिनबुडाचे आरोप करणे, रुग्ण दगावल्यास डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरविणे असे एक ना अनेक प्रश्न वैद्यकीय व्यवसायाला भेडसावत आहेत. या ज्वलंत प्रश्नांना डॉक्टर कलावंतांनी रंगमंचावर अभिनयाच्या माध्यमातून वाचा फोडली. नाशकात प्रथमच या एकांकिके चा प्रयोग यानिमित्ताने झाला.
डॉक्टरसोबत मुलगी विवाह करण्याची इच्छा प्रदर्शित करते, मात्र तिच्या इच्छेला आई-वडिलांचा विरोध असतो. डॉक्टरांच्या समस्यांचा पाढा ते वाचून दाखवितात. डॉक्टर मुलगा घरी मुलीला बघण्यासाठी आला असता मुलीच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येतो अन् तो मुलगा तातडीने प्रथमोपचार करून त्यांना जीवदान देतो, असे कथानक फिरत जाते. वडिलांचे मनपरिवर्तन होऊन ते विवाहास होकार देतात. कथानकातील एकापेक्षा एक सरस विनोदी संवादाने प्रेक्षकांना लोटपोट केले. अमोल देशमुख, मंजिरी देशमुख, वैशाली उने, संदीप मुळे, रमेश रोहिवाल, आनंद देशमुख, अनंत कुलकर्णी, विक्रम लोखंडे, अनंत कडेठाणकर यांच्या या एकांकिकेत भूमिका आहेत. शिल्पा सातारकर यांनी निवेदन केले.
एक लाखाचा निधी
या प्रयोगासाठी २०० रुपयांच्या प्रवेशिके चे वाटप आयएमएकडून करण्यात आले होते. या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील कुपोषणग्रस्तांच्या आरोग्य सुधारणेसाठी व आयएमएकडून चालविल्या जाणा-या पेठरोडवरील क्षयरोग सॅनिटोरियमसाठी निधी संकलित करण्यात आला. सुमारे एक लाख ६० हजारांचा निधी प्रयोगाद्वारे उभा राहिला. साठ हजार रुपयांचा खर्च जाता उर्वरित रक्कम समाजोपयोगी कामासाठी वापरली जाणार असल्याचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांनी सांगितले.