दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बेकायदेशीर गाळे उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:42 IST2017-11-14T00:37:45+5:302017-11-14T00:42:29+5:30
दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सेल हॉलमध्ये गाळे उभारण्यासाठी भिंती तोडून अनधिकृतपणे गाळे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सेल हॉलचे बांधकाम तोडताना जिल्हा उपनिबंधकांची कोणत्याच प्रकारची परवानगी घेतली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सभापती शिवाजी चुंबळे अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बेकायदेशीर गाळे उभारणी
पंचवटी : दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सेल हॉलमध्ये गाळे उभारण्यासाठी भिंती तोडून अनधिकृतपणे गाळे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सेल हॉलचे बांधकाम तोडताना जिल्हा उपनिबंधकांची कोणत्याच प्रकारची परवानगी घेतली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सभापती शिवाजी चुंबळे अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बाजार समितीतील सेल हॉलमध्ये समितीच्या आर्थिक हितासाठी १२ बाय १५ आकाराचे तब्बल ६२ गाळे तयार करून ते जीएसटी कर आकारणीसह मासिक बारा हजार रु पयांप्रमाणे भाडे करार पद्धतीने देण्याची तयारी सभापती चुंबळे यांनी केली होती. गेल्या आठवड्यात या गाळे उभारणीसंदर्भात बैठक बोलावली होती, मात्र बैठकीत या गाळ्यांना व्यापारी वर्गाने कडाडून विरोध केला होता. बाजार समितीच्या दोन सेल हॉलमध्ये डझनभर व्यापारी व्यावसायिक बाजार समितीला शुल्क व भाडे देतात. काही दिवसांपूर्वी भाडे कमी असल्याचे कारण नमूद करून सभापतींनी व्यापाºयांना नोटिसा बजावल्या होत्या. बाजार समितीत गाळे उभारणी करण्यासाठी कलम १२/१ नुसार परवानगी घेणे बंधनकारक आहे; मात्र बाजार समितीने सेल हॉलचे बांधकाम तोडताना व गाळे उभारणी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांची कोणत्याच प्रकारची परवानगी घेतली नाही. तसेच गाळे उभारणीचा ठराव झाला नाही व त्यातल्या त्यात बैठकीत कोणत्याच प्रकारची मंजुरीही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय काही संचालक गाळे उभारणीबाबत अंधारात असल्याचे बोलले जात आहे.
बाजार समितीने दुरुस्ती कामासाठी तसेच गाळे उभारणीसाठी परवानगी घेतलेली नाही. नियमाने परवानगी घ्यावी लागते. कोणत्याही कामासाठी स्ट्रक्चरल आॅडिट करणे गरजेचे असते. - नीळकंठ कºहे, जिल्हा उपनिबंधक
बाजार समितीचा आर्थिक हितासाठी निर्णय
बाजार समितीत सेल हॉल पूर्वीपासून आहे. केवळ गाळ्यांना शटर्स टाकण्याचे काम सुरू केले आहे. जिल्हा उपनिबंधकांना प्रस्ताव सादर केला आहे. तसेच जिल्हा उपनिबंधकांच्या परवानगीचा प्रश्न नाही. ६२ गाळे उभारणी करून ते भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत.
- शिवाजी चुंबळे, सभापती, बाजार समिती