नाशिकचे शहाजहांनी इदगाह मैदान सज्ज; उद्या होणार सामुहिक नमाजपठण
By अझहर शेख | Updated: April 10, 2024 17:29 IST2024-04-10T17:28:09+5:302024-04-10T17:29:24+5:30
शहर व परिसरात मुस्लीम बांधव गुरूवारी (दि.११) रमजान ईद (ईद-उल-फित्र) साजरी करणार आहेत.

नाशिकचे शहाजहांनी इदगाह मैदान सज्ज; उद्या होणार सामुहिक नमाजपठण
अझहर शेख, नाशिक : शहर व परिसरात मुस्लीम बांधव गुरूवारी (दि.११) रमजान ईद (ईद-उल-फित्र) साजरी करणार आहेत. यानिमित्ताने शहरातील त्र्यंबकरोड येथील ऐतिहासिक शहाजहांनी इदगाह मैदान सामुहिक नमाजपठणाच्या सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. सकाळी १० वाजता पारंपरिक पद्धतीने मैदानावर हजारो नागरिक एकाचवेळी ईदची नमाज पठण करणार आहेत.
शहर व परिसरासह जिल्ह्यात मंगळवारी (दि.९) कोठेही चंद्रदर्शन घडले नाही. यामुळे रमजान पर्वचे ३० उपवास (रोजे) बुधवारी (दि.१०) संध्याकाळी पुर्ण करण्यात आले. गुरूवारी पारंपरिक पद्धतीने ईद साजरी केली जाणार आहे. इदगाह मैदानावर शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखली नमाजपठण करण्यात येणार आहे. ईदगाहच्या पुरातन वास्तूला आकर्षक रंगरंगोटी इदगाह समितीकडून करण्यात आली आहे. तसेच मैदानावर ध्वनिक्षेपक यंत्रणाही उभारण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे महापालिकेकडून मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर तात्पुरत्या स्वरूपात नळांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य वास्तूभोवती असलेल्या ओटाही पाण्याने धुवून बुधवारी स्वच्छ करण्यात आला. तसेच मैदानावरही पाणी शिंपडून रोडरोडलर फिरवून सपाटीकरण करत अखेरचा हात फिरविण्यात आला. सकाळपासूनच मैदानाचे दोन्ही प्रवेशद्वार खासगी दुचाकी, चारचाकी वाहनांकरिता बंद करण्यात आले होते. केवळ मनपा सेवार्थ वाहनांना मैदानावर प्रवेश दिला जात होता.
पोलिसांनी घेतला मैदानाचा ताबा-
बुधवारी सायंकाळी पोलिस प्रशासनाकडूनही मैदानाचा ताबा घेण्यात आला. धातुशोधक कमान दोन्ही प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता समाजबांधवांनी वेळेमर्यादेचे पालन करावे, असे आवाहन खतीब यांनी केले आहे. तसेच उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था मनपाकडून मैदानावर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.