भेंडाळीत राबविणार आदर्श ऊर्जा ग्राम मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:02 IST2020-01-31T23:59:59+5:302020-02-01T00:02:08+5:30
सायखेडा : भारत सरकारच्या आदर्श ऊर्जा ग्राम कार्यक्षम कार्यक्रमांतर्गत उत्तर महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत भेंडाळीची निवड झाली आहे. यासंदर्भात ऊर्जा ...

भेंडाळीत राबविणार आदर्श ऊर्जा ग्राम मोहीम
सायखेडा : भारत सरकारच्या आदर्श ऊर्जा ग्राम कार्यक्षम कार्यक्रमांतर्गत उत्तर महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत भेंडाळीची निवड झाली आहे. यासंदर्भात ऊर्जा मंत्रालयाचे पत्र प्राप्त झाले असून, अधिकाऱ्यांनी पाहणीसुद्धा केली आहे.
राज्यात आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम मोहीम प्रायोगिक तत्त्वावर राबवून यामार्फत मोठ्या प्रमाणात ऊर्जाबचत केली जाणार आहे. ब्यूरो आॅफ एनर्जी एफिशिअन्सी, नवी दिल्ली यांच्या वतीने ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत सार्वजनिक ठिकाणावरील विजेवर चालणारी अकार्यक्षम उपकरणे बदलून नवीन उपकरणे टाकून ऊर्जाबचत कशी होऊ शकते हे प्रायोगिक तत्त्वावर दाखविण्यात येणार आहे.
टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातील इतर गावांमध्येसुद्धा ही योजना राबविण्यात येणार आहे. यात सार्वजनिक ठिकाणे, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालय, पाणीपुरवठा योजना, प्राथमिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक सभागृह, व्यायामशाळा, वाचनालय, क्रीडांगण, स्मशानभूमी, मंदिरे, पथदीप आदी ठिकाणांवरून ऊर्जाबचत करता येणार आहे.
या योजनेसाठी प्रायोगिक तत्त्वावर भेंडाळी ग्रामपंचायतीची निवड झाल्याने स्वागत होत आहे. सदर योजनेतील काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण होईल. यासंदर्भात कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोरख खालकर, लिपीक अनिल खालकर, शैलेश शिंदे उपस्थित होते.