राज्य, आंतरराज्य प्रवासाला परवानगी देण्याचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 16:47 IST2020-04-01T16:43:38+5:302020-04-01T16:47:58+5:30
नाशिक : देशात अचानक लागू करण्यात आलेली संचारबंदी व लॉकडाउनमुळे देशातील विविध भागात तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हजारो नागरिक अडकून पडले आहेत. लॉकडाउनच्या आठ दिवसांनंतर अशा लोकांचा धीर सुटू लागल्याचे पाहून त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचा विचार केला जात आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाला याबाबत प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करता राज्य व आंतरराज्य प्रवासाला सबळ कारणांमुळे अनुमती देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे

राज्य, आंतरराज्य प्रवासाला परवानगी देण्याचा विचार
नाशिक : देशात अचानक लागू करण्यात आलेली संचारबंदी व लॉकडाउनमुळे देशातील विविध भागात तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हजारो नागरिक अडकून पडले आहेत. लॉकडाउनच्या आठ दिवसांनंतर अशा लोकांचा धीर सुटू लागल्याचे पाहून त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचा विचार केला जात आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाला याबाबत प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करता राज्य व आंतरराज्य प्रवासाला सबळ कारणांमुळे अनुमती देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने २३ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाउन जाहीर केले असून, ज्याठिकाणी लोक आहेत त्यांना तेथेच थांबायचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे देशातील व राज्यातील विविध ठिकाणी हजारो नागरिक अडकून पडले असून रेल्वे, बस, विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. अडकून पडलेल्या नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. खिशातील पैसे संपत आले, तर पैसे असूनही वस्तू खरेदी करता येत नाही. अशा परिस्थितीत राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडे दररोज हजारो अर्ज, विनंत्या केल्या जात असून, त्यातील काही कारणे खरोखरच योग्य व खऱ्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, परंतु नागरिकांची अडचण दूर होईल असा विचार करून राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने काही अटी-शर्तींवर प्रवास करण्यास अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रामुख्याने एखाद्या नागरिकास सध्या रहिवासी जिल्ह्यामध्ये किंवा त्या जिल्ह्यामधून दुस-या जिल्ह्यात प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर त्या नागरिकाची प्रवासाची कारणमीमांसा, खातरजमा करून संबंधित पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक यांनी त्या नागरिकास परवानगी देण्याबाबत निर्णय घ्यावा, त्याचबरोबर राज्यातील नागरिकास दुसºया राज्यात प्रवास करणे गरजेचे असेल अशा नागरिकांनी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी मिळविण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
माल वाहतूक करणा-या वाहनांना माल वाहतुकीची परवानगी असल्याने त्या वाहनांना अटकाव करू नये, अशा वाहनांना परवानगीची गरज नसल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी काढले आहेत.