९० हजाराची पैशांची बॅग तासाभरात मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST2021-09-25T04:14:52+5:302021-09-25T04:14:52+5:30
नाशिकरोड : वृध्द महिलेची ९० हजार रोकड असलेली पेन्शनची गहाळ झालेली बॅग उपनगर पोलिसांनी रिक्षा चालकाच्या मदतीने ...

९० हजाराची पैशांची बॅग तासाभरात मिळाली
नाशिकरोड : वृध्द महिलेची ९० हजार रोकड असलेली पेन्शनची गहाळ झालेली बॅग उपनगर पोलिसांनी रिक्षा चालकाच्या मदतीने एका तासात परत महिलेला मिळवून दिली. सटाणा तालुक्यातील केळझर येथील शांताबाई पुंडलिक टोपले या गुरुवारी मुलगी व जावयासह दत्तमंदिर चौकाजवळील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या होत्या. दुपारी चारच्या सुमारास पेन्शनचे पैसे काढल्यानंतर त्या जावई व मुलीसह परिसरात खरेदी करण्यासाठी गेल्या. खरेदीनंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गावी जाण्यासाठी रिक्षात बसताना पैशाची बॅग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जवळील बिटको पोलिस चौकीत धाव घेऊन सहायक निरीक्षक भामरे यांना सांगितली.
भामरे यांनी सदर घटना वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांना सांगितली. दुय्यम पोलिस निरीक्षक भालेराव, सहायक निरीक्षक राकेश भामरे, उपनिरीक्षक विकास लोंढे, महिला उपनिरीक्षक तेजल पवार, पोलिस ठाकूर, कर्पे, शिंदे, गवळी यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन तक्रारदाराने खरेदी केलेल्या दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. बेंगलोर अय्यंगार बेकरीसमोर टोपले यांची पैशाची बॅग राहिल्याचे दिसले. ही बॅग रिक्षाचालक सूर्यकांत नालकर यांनी प्रामाणिकपणे उचलून बेकरीच्या ड्राॅवरमध्ये ठेवल्याचे दिसले. पोलिसांनी बॅग ताब्यात घेऊन तपासली असता नव्वद हजाराची रोकड व कागदपत्रे जशीच्या तशी असल्याचे आढळले. ९० हजाराची रोकड व कागदपत्रे असलेली बॅग टोपले यांना परत पोलिसांना दिली. या प्रामाणिकपणाबद्दल रिक्षाचालक नालकर यांचा सत्कार करण्यात आला.