नाशिक : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले छगन भुजबळ हे काही दिवसांपासून कुटुंबीयांसोबत परदेशात फिरायला गेल्यानंतर गुरुवारी नाशिकमध्ये परतले. ज्येष्ठ नेते शरद पवार अन् उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येत असतील तर मला आनंदच आहे. कोणाला मंत्रिमंडळातून काढून मला मंत्रिपद मिळावे, हे तर माझ्या मनातही नाही, असे भुजबळ यांनी माध्यमांशी बाेलताना सांगितले. ‘तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे,’ असे सांगून भुजबळ यांनी आपल्या मनातील खदखद अप्रत्यक्षरीत्या बोलून दाखविली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विराेधकांंकडून केली जात असून, त्यांचा राजीनामा घेऊन छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी चर्चा आहे. मात्र, भुजबळ यांनी नाशिकमध्ये येताच ही चर्चा निरर्थक असल्याचे सांगितले.
आपण पक्षावर नाराज असल्याने मुंबई, नाशिकमध्ये नव्हता? या पत्रकारांच्या प्रश्नावर भुजबळ म्हणाले की, नातवंडांना सुट्या असल्याने बाहेर होतो. हा पूर्वनियोजित दौरा होता. शुक्रवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती असून, पुणे जिल्ह्यात सावित्रीबाई फुले व महात्मा फुले पुतळा अनावरणप्रसंगी शरद पवार येतील. मीही या कार्यक्रमास जाणार आहे. नाराजीनाट्यानंतर मला कोणाचेच फोन आले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला मंत्री करतील, हे कधीही बोललो नाही.