सिडको : मी भुजबळ साहेबांच्या बंगल्यावरून बोलतोय, तुमचा जो काय वाद झालेला आहे. याबाबत माझे साहेबांशी, एसपी तसेच पोलीस कमिशनर यांच्याशी बोलणे झाले आहे. तुम्ही मला समक्ष येऊन भेटा, यावर आपण तोडगा काढू, असे म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचा वापर करून निफाड येथील शेतकऱ्याला भ्रमणध्वनीवरून दमदाटी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भुजबळ यांच्या स्वीय सहायकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित महेंद्र पाटील (रा. गंगापूर रोड) यास अटक केली आहे. याबाबत अंबड पोलिसांनी अशी माहिती दिली की, बुधवारी (दि.१८) रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित महेंद्र पाटील (रा. गंगापूर रोड, नाशिक) याने निफाड तालुक्यातील उगाव येथील सुनील कासुर्डे यांच्या भ्रमणध्वनीवर फोन करून ‘मी भुजबळ साहेबांच्या बंगल्यावरून बोलत आहे. तुमच्या केसमध्ये तुम्हाला मदत करू, माझे साहेबांशी बोलणे झालेले आहे. तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याशीदेखील बोलणे झाले आहे; परंतु तुम्ही समक्ष या, नाही तर तुमचा माणूस मला भेटायला पाठवा. खाली हात पाठवू नका. काय असेल ते करून घेऊ,’ असे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचा दुरुपयोग करून सुनील कासुर्डे यांना धमकाविले. सदर बाबीची कासुर्डे यांनी खात्री केली असता, भुजबळ यांच्या बंगल्यावरून अशा प्रकारे कोणालाच फोन करण्यात आले नसल्याचे लक्षात आल्यावर भुजबळ यांचे स्वीय सचिव महेंद्र पवार यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता, पोलिसांनी संशयित महेंद्र पाटील यास अटक केली आहे.
मी भुजबळ साहेबांच्या बंगल्यावरून बोलतोय !.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST