पत्नीच्या निधनानंतर पतीचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 00:48 IST2021-04-15T21:44:25+5:302021-04-16T00:48:19+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील माजी ग्रामपंचायत सदस्य महिलेचे अल्पशा आजाराने निधन झाले. सदर बातमी त्यांच्या पतीला समजताच त्यांचेही हृदयविकाराने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

अंजनाबाई रामदास खैरनार
पिंपळगाव बसवंत : येथील माजी ग्रामपंचायत सदस्य महिलेचे अल्पशा आजाराने निधन झाले. सदर बातमी त्यांच्या पतीला समजताच त्यांचेही हृदयविकाराने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
ग्रामपंचायतच्या माजी सदस्य अंजनाबाई रामदास खैरनार (६८) व रामदास विठ्ठल खैरनार (७२) हे पती-पत्नी पिंपळगाव बसवंत येथे राहत होते. मोठा मुलगा विलास राहुरी येथे तर लहान मुलगा गणपत राजगुरुनगर येथे स्थायिक झाले आहेत. अंजनाबाई या आजारी असल्याने त्यांना लहान मुलगा उपचारासाठी राजगुरुनगर येथे घेऊन गेला होता तर वडील मोठ्या मुलाकडे राहुरी येथे गेले होते. दरम्यान, सोमवारी (दि.१२) अंजनाबाई यांचे राजगुरुनगर येथे निधन झाले. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही बातमी दोन्ही मुलांनी काळजीपोटी दोन दिवस वडिलांपासून लपवून ठेवली. मात्र बुधवारी (दि.१४) पत्नीची ही बातमी कळताच रामदास खैरनार यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचेही निधन झाले. शेवटच्या क्षणीसुद्धा दोघांची भेट होऊ शकली नाही. त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
(१५ अंजना खैरनार, १५ रामदास खैरनार)