Huge enthusiasm of voters for Gram Panchayats | ग्रामपंचायतींसाठी मतदारांचा प्रचंड उत्साह

ग्रामपंचायतींसाठी मतदारांचा प्रचंड उत्साह

ठळक मुद्देमतदान केंद्रांवर रांगाच रांगा : कोरोनाचे भय न बाळगता मार्गदर्शक सूचनांकडे फिरवली पाठ ; दुपारनंतर मतदानाचा वाढला वेग

मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे दुपारी १.३० वाजेपर्यंत अनेक ठिकाणी ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. पुढे मतदानाचा वेग वाढत गेला. दरम्यान, काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांमध्ये काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, तर काही भागांत किरकोळ बाचाबाचीचेही प्रकार घडले. पोलीस यंत्रणेने अतिसंवेदनशील मतदार केंद्रांकडे विशेष लक्ष पुरविल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपालिकांची निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील ५५ ग्रामपालिका बिनविरोध झाल्याने ५६६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि.१५) सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. त्यासाठी जिल्ह्यात १,९५२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्या दोन तासांत बहुतांश मतदान केंद्रांवर १० ते १२ टक्के मतदान झाले. त्यानंतर सकाळी ११.३० वाजेपर्यंत मतदानाचा टक्का वाढत जाऊन तो २५ ते ३० टक्के झाला. दुपारी १.३० वाजेपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक मतदान नोंदविले गेले, तर अनेक ठिकाणी दुपारी ३.३० वाजेपर्यंत मतदानाचा वेग वाढून तो ७० टक्क्यांहून अधिक झाला होता. काही मोजक्या ग्रामपालिका वगळता बहुतांश ठिकाणी मतदारांचा मतदानासाठी प्रचंड उत्साह दिसून आला. ठिकठिकाणी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीचा पुरता फज्जा उडाला. मतदारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने प्रशासनही हतबल झाल्याचे बघायला मिळाले. ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड होण्याच्याही घटना घडल्या. नांदगाव तालुक्यातील वडाळी खु., दहेगाव, वंजारवाडी, जळगाव बु. , कऱ्ही याठिकाणी मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, तर सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथेही प्रभाग २ मधील मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांचा खोळंबा झाला होता. बागलाण तालुक्यात लखमापूर, ब्राह्मणगाव, दऱ्हाणे, नामपूर, ताहराबाद, उत्राणे, द्याने, तसेच मालेगाव तालुक्यातील येसगाव येथे किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने गोंधळाची स्थिती बघायला मिळाली.
पत्रिकेतून उमेदवारांची नावे गायब
अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे बघायला मिळाले. नांदगाव तालुक्यातील पानेवाडी येथे तर मशीनवरील मतपत्रिकेतून उमेदवारांची नावे गायब झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडून अखेर मतपत्रिकेत नावे टाकल्यानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. येवला तालुक्यातही ठाणगाव येथे उमेदवाराच्या निशाणीचे बटन दाबले असता १५ ते १७ मिनिटांनी मतदान होत असल्याचा आक्षेप उमेदवारांनी घेतल्यानंतर मशीन बदलण्यात आले.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मतदान केंद्र
मालेगाव तालुक्यातील दहिवाळ बोधे ग्रुप ग्रामपंचायतीमधील बोधे येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मतदान केंद्र उभारण्यात आल्याने बोधेकरांनी ७३ वर्षांत पहिल्यांदाच गावात मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी बोधेकरांना ग्रामपंचायतीसाठी दहिवाळ येथे, तर लोकसभा-विधानसभा मतदानासाठी सिताणे येथे जावे लागत होते; परंतु यंदा आयोगाने येथे मतदान केंद्राची व्यवस्था केली. शिवाय आदर्श केंद्र म्हणून घोषित करत मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागतही करण्यात आले.
मतदारांच्या रांगेत चेंगरला ह्यकोरोनाह्ण
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने मतदान केंद्रांवर सॅनिटायझरची, तसेच तापमान मापकाची व्यवस्था केली होती; परंतु मतदारांनी एकमेकांना खेटून लांबच लांब रांगा लावल्याने या रांगांमध्ये कोरोना चेंगरल्याची भावना ठिकठिकाणी व्यक्त झाली. अनेकांनी मास्क लावला नव्हता, तर गर्दी उसळल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. ग्रामीण भागात पहिल्यांदा जेथे कोरोनाचा शिरकाव झाला त्या निफाड तालुक्यातील विंचूरला तर मतदान केंद्रांवर सॅनिटायझर व तापमान मापकाची व्यवस्थाच केलेली नसल्याचे आढळून आले.
दिव्यांग, ज्येष्ठांची वाहतूक व्यवस्था
आपला मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उमेदवारांनी कसून मेहनत घेतली. दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी खास वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. गावातून शहरात नोकरी-रोजगारासाठी गेलेल्या मतदारांसाठीही विशेष वाहनांची व्यवस्था करून त्यांना गावात मतदानासाठी आणण्यासाठी एकच धांदल बघायला मिळाली. दिव्यांग मतदारांनाही उमेदवार समर्थकांनी कुणी खांद्यावर तर कुणी वाहनात घेऊन येत मतदान करून घेतले.

Web Title: Huge enthusiasm of voters for Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.