चिंतामणीला व्हीआयपी दर्शन कसे, नाशिकच्या भाविकाची नोटीस; उच्च न्यायलयात मागणार दाद
By संजय पाठक | Updated: January 18, 2024 14:18 IST2024-01-18T14:18:12+5:302024-01-18T14:18:33+5:30
नाशिकमधील एक भाविक कैलास दळवी यांना ही बाब खटकली आहे

चिंतामणीला व्हीआयपी दर्शन कसे, नाशिकच्या भाविकाची नोटीस; उच्च न्यायलयात मागणार दाद
संजय पाठक, नाशिक- देवासमोर सर्व समान असतात, असे म्हंटले जाते, मात्र अनेक मंदिरांमध्ये सशुल्क दर्शनाची व्यवस्था असून काही ठिकाणी व्हीआयपी दर्शनाची देखील व्यवस्था आहे. अष्टविनायकातील एक असलेल्या थेऊरमध्ये चिंतामणी मंदिराच्या बाहेर व्हीआयपी दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था असून तसा फलक देखील तेथे लावण्यात आला आहे. नाशिकमधील एक भाविक कैलास दळवी यांना ही बाब खटकल्याने त्यांनी या देवस्थानला नोटीस बजावली असून फलक न हटवल्यास उच्च न्यायलयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.
नाशिकच्या विंचुर दळवी गावचे माजी सरपंच असलेल्या कैलास दळवी यांनी ॲड. मनोज पिंगळे यांच्या मार्फत ही नोटीस चिंचवड देवस्थान ट्रस्टला बजावली आहे. अष्टविनायक हे महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असून भाविक अष्टविनायक दर्शनाची यात्रा करीत असतात. त्यामुळे राज्य शासनाने अष्टविनायकांच्या परीसराच्या विकासासाठी निधी दिला जातो आणि अर्थातच हा निधी जनतेच्या कर रूपातून मिळालेला असतेा. त्यामुळे अशा ठिकाणी भेदभाव करण्याबाबत दळवी यांनी आक्षेप घेतला आहे. दळवी यांनी चिंतामणी दर्शनासाठी नुकतीच भेट दिली. यावेळी थेऊर येते व्हीआयपी दर्शन असे फलक लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अनेक भाविक चार ते पाच तास रांगा लाऊन दर्शन घेत असताना दुसरीकडे मात्र शंभर रूपये शुल्क भरणारे व्हीआयपी ठरवण्यात आले आणि त्यांना विशेष पास देऊन दर्शन घडवले जात होते. त्यामुळे ॲड मनोज पिंगळे यांच्या मार्फत त्यांनी नोटिस बाजवली आहे.