नाशिक : महापालिकेच्या मिळकतीत समाजमंदिर, अभ्यासिका, व्यायमशाळा चालविणाऱ्या संस्थांनी आत्तापर्यंत या मिळकतींच्या माध्यमातून किती उत्पन्न मिळविले आणि त्या बदल्यात या मिळकतींवर किती खर्च केला याचा ताळेबंद संबंधित संस्थांना सादर करण्यासाठी महापालिकेच्या मिळकत विभागाने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. दहा दिवसांत माहिती सादर न करणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने संबंधित संस्थांनीदेखील माहिती देण्यास सुरुवात केली असून, आत्तापर्यंत ५० संस्थांनी माहिती सादर केली आहे.महापालिकेच्या वतीने शेकडो मिळकती बांधून त्या खासगी संस्थांना विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. अनेक राजकीय आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून याठिकाणी अभ्यासिका, वाचनालय, व्यायामशाळा, सभागृह, बॅडमिंटन हॉल आणि तत्सम उपक्रम राबविले जातात. त्यासाठी या संस्थांकडून शुल्क आकारणी केली जाते. अनेक संस्था सेवाभावी संस्था असल्या तरी काही राजकीय व्यक्तींनी त्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे पालिकेला शुल्क कमी मिळते आणि संबंधित संस्था किंवा व्यक्ती मात्र आर्थिकदृष्ट्या गब्बर होत चाललेले आहेत. बहुतांशी संस्था या राजकीय नेते आणि नगरसेवकांच्या ताब्यात आहेत. काही मिळकती ताब्यात घेतल्यानंतर त्या कोणत्याही वापराविना पडूनच आहेत. पालिकेच्या मिळकतींबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, नाममात्र दराने घेतलेल्या या मिळकतींबाबत पालिकेला जाब विचारला आहे. गंगापूररोडवरील एक अभ्यासिका न्यायालयाच्या आदेशानुसार सील करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पालिकेच्या मिळकत विभागाने अशा प्रकारे मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यास प्रारंभ केला आहे.महापालिकेच्या मालकीची इमारत कोणतीही मुदतवाढ न घेता वापरत आहात ही बाब बेकायदेशीर आहे. तसेच सदर मिळकत ताब्यात घेतल्यानंतर आपण त्याचा वापर करून उत्पन्न घेत आहात. मिळकत ताब्यात घेतल्यापासून अशा प्रकारे किती उत्पन्न मिळाले आणि किती खर्च केला, याचा ताळेबंद दहा दिवसांत सादर करावा, असे पालिकेने संस्था आणि व्यक्तींना दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे. दहा दिवसांत याबाबत खुलासा करावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या नोटिसीत म्हटले आहे. या नोटिसींना आत्तापर्यंत ५० संस्थांनी उत्तरे पाठविली आहेत. (प्रतिनिधी)
पालिकेच्या मिळकतीतून किती उत्पन्न कमविले?
By admin | Updated: August 22, 2015 23:55 IST