इंदिरानगर : महापालिकेने बांधलेली घरकुले परस्पर भाडेतत्त्वावर देणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश विधी समितीने देऊनही या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याचे पाहून भारतनगर आणि वडाळागावातील घरकुले भाडेतत्त्वावर देण्याचा जोरदार सपाटा लावण्यात आला आहे. मूळ घरमालक मात्र अजूनही झोपडपट्टीतच राहत असल्यामुळे शहर झोपडपट्टी मुक्त होण्यास आणि स्मार्ट सिटी होण्यास खोडा निर्माण झाला आहे.भारतनगर आणि वडाळागाव परिसरातील घरकुल लाभार्थ्यांची महापालिकेच्या वतीने पाहणी करण्यात येऊन त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली व त्यानंतर लाभार्थी ठरवण्यात आले होते. टप्प्या टप्प्याने लाभार्थ्यांना सोडत पद्धतीने घरकुलांचे वाटप करण्यात आले त्यापैकी काही लाभार्थ्यांनी नवीन घरकुलात स्थलांतर केले, तर काहींनी घरकुले भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. घरकुल योजनेतील घर भाडेतत्त्वावर देऊन स्वत: मात्र पुन्हा झोपडे टाकूनच राहतात त्यामुळे शहर झोपडपट्टीमुक्त होण्यास आणि स्मार्ट सिटी बनण्यास खोडा निर्माण होत आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी केल्यानंतर विधी समितीने घरकुले भाड्याने देणाºयांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला यापूर्वीच दिले आहेत. परंतु महापालिका प्रशासनाने या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा फायदा घरकुलधारकांनी घेतला आहे.
महापालिकेने बांधलेली घरकुले परस्पर भाडेतत्त्वाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:54 IST