पाण्यासाठी महिला नगरसेवकाच्या घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 00:02 IST2020-05-20T22:48:22+5:302020-05-21T00:02:18+5:30
सिडको : प्रभाग क्रमांक २५ मधील कामटवाडे, अभियंतानगर व परिसरात नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने बुधवारी परिसरातील नागरिकांनी थेट नगरसेवकाच्या घरीच पाणी भरण्यासाठी गर्दी केली. अखेर दखल घेत प्रशासनाने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला.

पाण्यासाठी महिला नगरसेवकाच्या घरी
सिडको : प्रभाग क्रमांक २५ मधील कामटवाडे, अभियंतानगर व परिसरात नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने बुधवारी परिसरातील नागरिकांनी थेट नगरसेवकाच्या घरीच पाणी भरण्यासाठी गर्दी केली. अखेर दखल घेत प्रशासनाने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला.
गेल्या चार दिवसांपासून कामटवाडा, अभियंतानगर, इंद्रनगरी, पवननगर, रायगड चौक परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, काही ठिकाणी पाणी येते तर काही ठिकाणी पूर्णपणे बंद झाले आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाउनसारख्या परिस्थितीत आरोग्याच्या दृष्टीने पाणी ही अत्यावश्यक बाब असतानाही महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे नियमित पाणीपुरवठा केला जात नाही.
नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी दोन दिवसापासून सतत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना केली. तथापि, अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. दरम्यान, बुधवारी सकाळी पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून प्रभागातील महिलांनी थेट रिकामे हंडे घेऊन नगरसेवक साबळे यांचे निवासस्थान गाठले व पाण्याची मागणी केली. परंतु त्यांच्याकडेही पाणी नसल्यामुळे बोअरिंगचे पाणी या महिलांना द्यावे लागले.
महापालिकेच्या या उदासीनतेबाबत साबळे यांनी थेट शहर अभियंता संजय घुगे व मनपा आयुक्त गमे यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितल्यानंतर यंत्रणा कामाला लागली. सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत पाण्याच्या टाकीतून टॅँकर भरून त्याद्वारे कामटवाडे, पवननगर, एकदंत चौक, इंद्रनगरी परिसरात टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागला. दरम्यान, पाणीपुरवठ्याचे सर्वच अधिकारी निष्काळजी असून, त्यामुळे नवीन यंत्रणा आयुक्तांनी उभी करावी, अशी मागणी साबळे यांनी केली आहे.