सिडको भागात आकर्षक देखावे
By Admin | Updated: September 11, 2016 01:50 IST2016-09-11T01:49:14+5:302016-09-11T01:50:21+5:30
समाजप्रबोधन : सार्वजनिक मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर

सिडको भागात आकर्षक देखावे
सिडको : सिडको व अंबड भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील बहुतांशी मंडळांचे देखावे पूर्ण झाले असून, शनिवारी देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. तसेच उद्या रविवार असल्याने देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी वाढणार आहे.
सिडको भागात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सार्वजनिक मंडळांकडून समाज प्रबोधनपर पौराणिक व ऐतिहासिक तसेच सद्यस्थितीवर आधारित देखावे सादर केले जातात. यंदाच्या वर्षी अनेक मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.
सिडको वसाहत मित्रमंडळाने यंदाच्या वर्षी हरविलेले बालपण हा सजीव देखावा सादर केला आहे. मंडळाने अद्याप तारांगण, वैष्णव माता, अय्यप्पा स्वामी, माहूरचा गड, नरसिंहाचा देखावा आदि देखावे सादर केले आहेत. याबरोबरच सामाजिक प्रबोधनपर देखाव्यांमध्ये वीज वाचवा देश वाचवा, पर्यावरण रक्षण वसुंधरेचे संरक्षण, जल बचत काळाची गरज, बेटी बचाव यांसारख्या विषयांवर आधारित देखावे सादर केले आहेत. याबरोबरच मंडळाकडून सामाजिक उपक्रमही गणेशोत्सव काळात राबविले जातात. यामध्ये भूकंपग्रस्तांना मदत, नेत्रदान तपासणी, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष किरण खांडरे, अध्यक्ष अक्षय खांडरे, संजय शेट्टी, यशवंत लहामगे, संदीप केंगे, राजेंद्र सोनवणे, दीपक शिंदे, दीपक लाड, बाळा पावटेकर आदिंचा समावेश आहे.
सिडको परिसरातील राजे छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धेत सहभागी व्हा आणि दररोज जिंका बक्षिसांचे आयोजक करण्यात आले आहे. यात अंताक्षरी, रांगोळी, डान्स, सुदृढ बालक स्पर्धा, फॅशन शो, फन फेअर आदिंसह विविध स्पर्धांच्या माध्यमातून विजेत्यांना एलईडी, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाइल, पैठणी, रोख रक्कम, सायकल, डिनरसेट यांसह अनेक बक्षिसे ठेवण्यात आली आहे. दरम्यान, मंडळांकडून विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यावर भर दिला जातो. यामध्ये नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदि. मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सवामध्ये धार्मिक देखाव्यांचे सादरीकरण करणे होय, दरवर्षी मंडळ एकापेक्षा एक तीर्थक्षेत्र, तसेच धार्मिक संकल्पनेवर आधारित देखावे सादर करते. मंडळाने याआधी सादर केलेले सुवर्ण मंदिर, वैष्णव देवी, जेजूरीगड, सुवर्णतुला, गावाची जत्रा हे देखावे आकर्षण ठरले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रवीण तिदमे, सागर जाधव, राजेंद्र मोहिते आदिंनी यासंदर्भात माहिती दिली. (वार्ताहर)