होरी खेले किसन गिरिधारी...
By Admin | Updated: October 24, 2015 23:47 IST2015-10-24T23:47:26+5:302015-10-24T23:47:53+5:30
कार्यक्रम रंगला : बासरीवादन, नृत्य कलाविष्काराला रसिकांची दाद

होरी खेले किसन गिरिधारी...
नाशिक : पन्नास विद्यार्थ्यांनी बासरीवादनातून सादर केलेली रागदारी... श्रीकृष्णाच्या वृंदावनात खेळल्या जाणाऱ्या होळीची नृत्याविष्कारातून झालेली पेशकश... त्यावर बासरीच्या स्वर्गीय सुरावटींनी चढवलेला कळस... अशा सर्वांगसुंदर मैफलीची अनुभूती अलोट गर्दीतल्या प्रत्येकाची सायंकाळ समृद्ध करून गेली...
स्व. वसंतराव रामचंद्र नेवासकर स्मृती समारोहानिमित्त वेणुनाद सुषीर संवाद वर्गाच्या वतीने परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आज सायंकाळी ही मैफल रंगली. ‘वेणुनाद’च्या ५० विद्यार्थ्यांनी ‘स्वानुभूती’ कार्यक्रमात बासरी सहवादन करीत मैफलीला प्रारंभ केला. या विद्यार्थ्यांनी बासरीवर राग भूप सरगम पेश केला. सुयश देवधर, सचिन शाळिग्राम, डॉ. विशाल वाक्चौरे, राहुल सानप, राजश्री लखोटिया, मोहिनी सूर्यवंशी, मुग्धा जोशी यांनी राग बिलावल व यमनची सरगम, तर बालकलाकार दुर्वा कुलकर्णी, गार्गी शाळिग्राम, व्योम अध्यारू यांनी राग भूपची सुरावट सादर केली.
दुसऱ्या टप्प्यात ‘होरी रंग सू भरिरी’ हा मोहन उपासनी यांच्या संगीत रचनेवर आधारित कार्यक्रम रंगला. वृंदावनमध्ये खेळल्या जाणाऱ्या होळीचे विविध रंग नृत्यांतून सादर करण्यात आले. ‘रंग में कैसे होरी खेलूंगी सॉँवरिया के संग’, ‘सावरे होरी खेलन आयो’, ‘कान्हा तेरी घुंगटिया पहनी हैं’, ‘सॉँवरियॉँ आपा होरी खेलो जी’, ‘रंग भरे रंग’, ‘किन संग खेलू होरी’ या गीतांवर आदिती पानसे-नाडगौडा, कीर्ती भवाळकर, सुमुखी अथनी यांनी नृत्ये सादर केली. सप्त रंगांची सप्त गाणी ज्ञानेश्वर कासार, अस्मिता सेवेकरी यांनी अप्रतिमरीत्या सादर केली. भूषण कोथमिरे (संवादिनी), सतीश पेंडसे (तबला), अभिजित शर्मा (आॅक्टोपॅड), अनिल धुमाळ (सिंथेसायझर), प्रसाद भालेराव (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली. प्रेम, विरह, प्रतीक्षा अशा श्रीकृष्ण व राधेच्या निरनिराळ्या भावमुद्रांचे दर्शन घडवत या नृत्यांगनांनी रसिकांची दाद घेतली.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. अरुण नेवासकर, श्रीकांत बेणी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. स्वानंद बेदरकर यांनी निवेदन केले. नेपथ्य व प्रकाशयोजना ईश्वर जगताप यांची होते. डॉ. मेधा उपासनी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संगीत वर्गाचे विद्यार्थी-पालकांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
सोनार यांनी घेतली दाद
पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे मुंबईतील शिष्य विवेक सोनार यांच्या एकल बासरीवादनाने कार्यक्रमाला आगळ्या उंचीवर नेले. त्यांनी लयकारी, तंत्रकारी ही बासरीवादनाची वैशिष्ट्ये उलगडून दाखवत स्वर्गीय सुरावटींचा प्रत्यय दिला. ‘वाचस्पती’ या अनवट रागातील बंदिश सादर करीत त्यांनी बासरीच्या अद्भुत सामर्थ्याची प्रचिती दिली. त्यानंतर श्रोत्यांच्या पसंतीची धून सादर करीत त्यांनी मैफलीत कळस चढवला. ओजस अढिया यांनी त्यांना तबल्यावर साथ दिली.