महापालिका ताम्रपत्राने करणार मान्यवरांचा सन्मान
By Admin | Updated: August 3, 2015 00:26 IST2015-08-03T00:26:17+5:302015-08-03T00:26:55+5:30
सिंहस्थ तयारी : ध्वजारोहण होणार दिमाखात

महापालिका ताम्रपत्राने करणार मान्यवरांचा सन्मान
नाशिक : पुरोहित संघ सिंहस्थ धर्मध्वजारोहण सोहळ्यात मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा वचपा काढण्यासाठी महापालिका आता पुढे सरसावली असून, येत्या १९ आॅगस्टला तपोवनात साधुग्राममध्ये होणाऱ्या आखाड्यांचा ध्वजारोहण सोहळा दिमाखात करण्याची तयारी सुरू झाली आहे. या सोहळ्यात महापालिकेकडून मान्यवरांना ताम्रपत्र देऊन गौरविण्याची संकल्पना असून, त्यावर सुमारे सव्वासहा लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
दि. १४ जुलैला रामकुंडावर पुरोहित संघाच्या वतीने आयोजित धर्मध्वजारोहण सोहळ्यात महापौर, उपमहापौर, स्थायी समितीसह आयुक्तांनाही दुर्लक्षित करण्यात आल्याने महासभेत सुमारे चार तास चाललेल्या चर्चेतून नाराजीचा सूर उमटला होता.
सदर कार्यक्रम महापालिकेमार्फतच होणे अपेक्षित असताना पुरोहित संघ व भाजपाने कार्यक्रम हायजॅक केल्याबद्दलही संताप व्यक्त करण्यात आला होता. यावेळी महापौरांनी सदस्यांची भावना लक्षात घेऊन दि. १९ आॅगस्टला तपोवनात साधुग्राममध्ये होणारा आखाड्यांचा ध्वजारोहण सोहळा दिमाखात करण्याचा मनोदय जाहीर केला होता. त्यानुसार, महापालिकेने आखाड्यांच्या ध्वजारोहण सोहळ्याची तयारी चालविली असून, सोहळ्याला नाशिककरांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
याशिवाय सर्व धर्मीय धर्मगुरूंनाही निमंत्रित करून त्यांच्याकडून सिंहस्थ यशस्वी पार पडावा आणि विश्वकल्याणार्थ प्रार्थना म्हटली जाणार आहे. महापालिकेमार्फत तपोवनातील संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ उभारण्यात येणाऱ्या रामानंदाचार्य स्वागत कमानीजवळ भव्य व्यासपीठ साकारले जाणार आहे. या सोहळ्यात प्रमुख श्रीमहंतांसह मान्यवरांचे स्वागत महापालिकेमार्फत करण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी महापालिकेने कायमस्वरूपी आठवण राहावी यासाठी खास ताम्रपत्रच देण्याची योजना आखली आहे. त्यासाठी १० बाय १६ इंचाचे ताम्रपत्र तयार करून घेण्यासाठी ई-निविदा मागविल्या असून, सुमारे सव्वा लाख रुपये खर्च अपेक्षित धरला आहे.
सदर निविदा १० आॅगस्टलाच उघडून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असून, संबंधित निविदाधारकाला १९ आॅगस्टच्या आत ताम्रपत्राची पूर्तता करून द्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)