नाशिक : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मिळकत करामध्ये केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानासमोर घरपट्टीची होळी करण्यात आली आणि भाजपाविरोधी घोषणा देण्यात आल्या. मंगळवारी (दि.२०) झालेल्या महासभेत आयुक्तांनी ठेवलेल्या मिळकत कराच्या दरवाढीच्या प्रस्तावास सत्ताधारी भाजपाने मंजुरी दिली. या निर्णयाच्या विरुद्ध सभागृहातच शिवसेनेसह विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला होता. या दरवाढीचे पडसाद बुधवारी (दि.२१) उमटले. भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने महापौरांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी, विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश बेलदार यांच्या नेतृत्वाखाली घरपट्टीची होळी करण्यात आली तसेच सत्ताधारी भाजपासह मुख्यमंत्र्यांविरोधी घोषणा देण्यात आल्या. सदर करवाढ मागे घेण्यात आली नाही तर भाजपाचे आमदार, महापौर यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात शिवसेना विभागप्रमुख अमोल सूर्यवंशी, उपविभागप्रमुख देवा जाधव, उमेश चव्हाण, गणेश गडाख, गोकुळ मते, किशोर निकम, मनीष खेले, श्रीकांत मगर, नंदेश ढोले, रितेश साळवे, प्रवीण भडांगे, मनोज सावंत, अजिंक्य गायधनी, मयूर पगार, विहार चौधरी, विशाल पगारे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भारतीय विद्यार्थी सेनेकडून घरपट्टीची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:52 IST