रेशनकार्डसाठी श्रमजीवी संघटनेचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:57 IST2020-07-22T20:46:10+5:302020-07-23T00:57:08+5:30
अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील सुमारे ४७८ आदिवासी बांधवांना रेशनकार्ड देण्यात यावे, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन ...

रेशनकार्डसाठी श्रमजीवी संघटनेचे धरणे
अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील सुमारे ४७८ आदिवासी बांधवांना रेशनकार्ड देण्यात यावे, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आदिवासी बांधवांनी चार-पाच महिन्यांपूर्वी रेशनकार्ड मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केले होते. मात्र प्रशासनाने कोरोनासारख्या महामारीच्या काळात गोरगरिबांना वेठीस धरून शिधापत्रिकेपासून वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ येथील तहसील कार्यालयावर बुधवारी श्रमजीवी संघटनेने धरणे आंदोलन केले. यादरम्यान जोपर्यंत रेशनकार्ड मिळत नाही तोपर्यंत फिजिकल डिस्टन्स ठेवून आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका संघटनेने घेतल्याने तालुका प्रशासनात धावपळ उडाली. आदिवासी गोरगरिबांना रेशनकार्ड मिळावे यासंदर्भात विवेक पंडित यांनी कोरोनाकाळात मजूर, शेतमजूर, हातावरचे पोट असलेल्या गोरगरिबांचे जगणे अवघड बनेल या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याची दि. ३ एप्रिल रोजी सुनावणी होऊन पात्र वंचित आदिवासी अर्जदारांना शिधापत्रिका देण्यासाठी अवगत करण्यात आले होते.
तालुका प्रशासनाने अर्जदारांना तत्काळ प्रभावाने रेशनकार्ड वाटप केले, तर यापूर्वी मागणी केलेल्या अर्जदारांना रोज एक गाव याप्रमाणे कार्ड तयार करून प्राधान्य शिक्का मारून वंचितांना रेशनकार्ड देण्यात येईल, असे आश्वासन नायब तहसीलदार बोडके व पुरवठा अधिकारी टर्ले यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. वारंवार हेलपाटे मारूनही रेशनकार्ड मिळाले नाही. यावेळी प्रत्यक्ष मिळाल्याने आदिवासी गोरगरिबांच्या अंगी उत्साह संचारला आणि तहसील आवारातच पावरीनृत्य करून आपला आनंद साजरा केला. यावेळी तालुक्यातील उंबरदे, माणी, देवमाळ, थविलपाडा, चिकाडी, कुकुडमुंडा, उंबरपाडा, अंबाडादहाड, गाळबारी, दुर्गापूर, मोठा तळपाडा, मनखेड आदी गावातील वंचितांचा समावेश आहे.