Hold Dussehra rally among 100 people, otherwise take action against Shiv Sena | दसरा मेळावा शंभर लोकांत करा, अन्यथा शिवसेनेवर कारवाई

दसरा मेळावा शंभर लोकांत करा, अन्यथा शिवसेनेवर कारवाई

ठळक मुद्देरामदास आठवले यांचा इशाराशेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याला कर्ज काढण्याचा सल्ला

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शिवाजी पार्कवर केवळ शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करावा, अन्यथा शिवसेनेला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्धपौर्णिमा तथा गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरी करण्यात आले आहे. त्यानुसार शिवसेनेनेही शिवाजी पार्कवर शंभर लोकांच्या उपस्थितीतच दसरा मेळावा साजरा करावा, अन्यथा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच शिवसेनेवर कारवाई करावी लागेल, असेही आठवले म्हणाले. यावेळी राज्यातील महाआघाडी सरकारला टीकेचे लक्ष्य करीत महाराष्ट्र एक नंबरवर पोहोचला आहे, परंतु मुख्यमंत्र्यांमुळे नव्हे तर कोरोनामुळे असा टोला त्यांनी लगावला.
राज्यातील सरकार सध्या तीन चाकांवर चालले असून, असे सरकार दीर्घकाळ चालणार नसल्याचे भाकीतही त्यांनी केले. त्याचप्रमाणे राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्राकडे दहा हजार कोटींची मागणी केली आहे.
परंतु, तत्काळ एवढी मदत शक्य नाही. त्यामुळे राज्य सरकारने कर्ज काढून शेतकर्यांना मदत करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान, मराठा समाजाचा ओबीसीत समावेश न करता स्वतंत्र आरक्षण मिळायला हवे अशीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीचा दबाव
केंद्रीय मंत्रिमंडळाने मंदिरे खुली करण्यासंदर्भात निर्णय घेतला असून, भाविकांच्या मागणीनुसार राज्यातील मंदिरेही खुली करण्याची गरज आहे. फिजिकल डिस्टन्सचे पालन करून मंदिरे उघडणे शक्य आहे. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सत्तेत सहभागी असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबाव असल्यानेच ते मंदिरे उघडण्याचा निर्णय घेत नसल्याचा आरोपही रामदास आठवले यांनी केला आहे.
ड्रग्ज घेणाºया अभिनेत्रींना टाळा
बॉलिवूडमधील चित्रपट निर्मात्यांनी ड्रग्ज घेणाºया अभिनेत्रींना काम देऊ नये अन्यथा अशा निर्मात्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूड मुंबईतच राहणार असून, ते इतरत्र हलविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: Hold Dussehra rally among 100 people, otherwise take action against Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.