‘हिंदुस्थान सबसे प्यारा... सबसे न्यारा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:36 IST2019-01-20T00:36:32+5:302019-01-20T00:36:44+5:30
आर्टिलरी सेंटर येथील आर्मी सिम्फनी बॅँड पथकाने सादर केलेल्या ‘हिंदुस्थान सबसे प्यारा... ‘सबसे न्यारा, ‘निश्चय कर अपनी जीत करो’, ‘ताकद हमारी वतन से हैं’ आदी विविध देशभक्तीपर गीतांसह मराठीतील ‘याड लागलं’सारख्या चित्रपट गीतांनी नाशिककरांची दाद मिळवली.

‘हिंदुस्थान सबसे प्यारा... सबसे न्यारा’
नाशिक : आर्टिलरी सेंटर येथील आर्मी सिम्फनी बॅँड पथकाने सादर केलेल्या ‘हिंदुस्थान सबसे प्यारा... ‘सबसे न्यारा, ‘निश्चय कर अपनी जीत करो’, ‘ताकद हमारी वतन से हैं’ आदी विविध देशभक्तीपर गीतांसह मराठीतील ‘याड लागलं’सारख्या चित्रपट गीतांनी नाशिककरांची दाद मिळवली.
विश्वास लॉन्स येथे शनिवारी (दि.१९) लायन्स क्लब आॅफ स्मार्ट सिटीतर्फे सैन्य दलाच्या सिम्फनी बॅँड पथकाने विविध देशभक्तीपर गीतांसह चित्रपट गीतांचे सादरीकरण करीत रसिकांची मने जिंकली. प्रारंभी बिग्रेडिअर जे. एस. बिंद्र्रा, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, बीएसएनएलचे महाव्यवस्थापक नितीन महाजन, बांधकाम विभागाचे हेमंत पगार, विश्वास ठाकूर, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नाशिकमधील सामान्य नागरिकांसाठी दोनदा राष्ट्रपती पुरस्कार विजेता तथा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीतील सैन्य संचलनाची शोभा वाढविणाऱ्या ‘आर्मी सिम्फनी बँड’ने शनिवारी केलेले वादन नाशिककरांसाठी आनंददायी आणि देशभक्तीला उधाण आणणारी पर्वणीच ठरले. सिम्फनी हा सैन्य दलातील महत्त्वाचा बँड म्हणून ओळखला जातो.
मोर्टार, रॉकेट लॉन्चरने वेधले लक्ष
नाशिककरांसाठी आयोजित आर्मी सिम्फनी बँड वादनाच्या कार्यक्रमात मोर्टार (उखळी तोफा), रॉकेट लॉन्चर यांसह सैन्यातील विविध शस्त्रास्त्रे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. या शस्त्रांनी अबालवृद्ध नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी सैन्याचे जवान आणि शस्त्रांसोबत सेल्फी घेण्याचा आनंद लुटला.