१ एप्रिलपासून राज्यात नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:36 IST2019-03-31T01:36:18+5:302019-03-31T01:36:39+5:30
येत्या १ एप्रिलपासून संपूर्ण राज्यात उत्पादित होणाऱ्या सर्वच नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसविणे बंधनकारक असून, सदरच्या नंबर प्लेट्स बसवून देण्याची जबाबदारी संबंधित उत्पादक कंपन्यांवर आहे.

१ एप्रिलपासून राज्यात नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी’
पंचवटी : येत्या १ एप्रिलपासून संपूर्ण राज्यात उत्पादित होणाऱ्या सर्वच नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसविणे बंधनकारक असून, सदरच्या नंबर प्लेट्स बसवून देण्याची जबाबदारी संबंधित उत्पादक कंपन्यांवर आहे.
कंपनीने वितरकांमार्फत वाहनधारकांना नंबर प्लेट द्याव्या लागणार आहेत. नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसविण्याची अंमलबजावणी होणार असली तरी जुन्या वाहनांबाबत कायदा तयार असून, निर्णयदेखील झाला असला तरी त्याबाबत वितरक किंवा पुरवठादार नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.
वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर रजिस्ट्रेशन नंबर व्यतिरिक्त कायमस्वरूपी नंबर तसेच होलोग्राम व आयएनडी असे लिहिलेले असणार आहे. नंबर प्लेट काढण्याचा प्रयत्न केला तर प्लेट तुटेल व बाजारात तशी प्लेटही उपलब्ध होणार नाही. वाहनधारकांना अपघात झाल्यानंतर किंवा कोणी वाहनाची चोरी करताना नंबर प्लेट तुटल्यावर पुन्हा कंपनी किंवा वितरकाशी संपर्क साधावा लागणार आहे.
नागरिक संभ्रमात
येत्या १ एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या सर्वच नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादकांकडून दिली जाणार असली तरी जुन्या वाहनांसाठी अशाप्रकारची नंबर प्लेट देण्याबाबतची कुठलीही उपाययोजना सध्या तरी अस्तित्वात नाही. जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेटबाबत कुठलीही अधिसूचना अद्याप जारी झाली नसल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले.