सुधारित नियमावलीच्या माध्यमातून छुपी भाडेवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:08 AM2018-10-24T00:08:45+5:302018-10-24T00:09:15+5:30

महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरात केलेली अल्पशी कपात म्हणजे हास्यास्पद प्रकार असून, सुधारित नियमावलीतही छुपी भाडेवाढ दिसून येत आहे. कलावंत व नाट्यप्रेमी दोघांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे.

Hidden ferries through revised rules | सुधारित नियमावलीच्या माध्यमातून छुपी भाडेवाढ

सुधारित नियमावलीच्या माध्यमातून छुपी भाडेवाढ

Next

नाशिक : महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरात केलेली अल्पशी कपात म्हणजे हास्यास्पद प्रकार असून, सुधारित नियमावलीतही छुपी भाडेवाढ दिसून येत आहे. कलावंत व नाट्यप्रेमी दोघांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. नियमावलीस मान्यता मिळाल्यास प्रशासनाविरुद्ध रंगकर्मी, आयोजक असा सामना पुन्हा पहावयास मिळू शकतो.  महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करून चौपट आणि पाचपट भाडे वाढविल्याने रंगकर्मींमध्ये आधीच तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यातच सभापती हिमगौरी आडके यांनी रंगकर्मींना दिलासा देऊ असे जाहीर केले असले तरी यापूर्वी स्थायी समितीने फार दिलासा दिला नव्हता. दोन महिन्यांपासून याबाबत चर्चा, निवेदने यांचे गुºहाळ चालू आहे. प्रशासनाने पुढील पंधरा वर्षं देखभाल दुरुस्तीच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी तब्बल पाच ते सहापट दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने कलावंत व प्रशासन भिडले होते. स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी भाडेवाढीत अल्पशी कपात करून विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; पण याद्वारे रंगकर्मी व रसिकांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे केले असल्याची भावना रंगकर्मी व नाट्य परिषद सदस्यांनी व्यक्त केली आहे. आता मिळकत विभागाने कालिदासची सुधारित नियमावली अवलोकनार्थ सादर केली आहे. त्यातून पुन्हा एकदा भाडेवाढीचा सामना करावा लागणार आहे. सुधारित नियमावलीनुसार १५ दिवस अगोदर कार्यक्रम रद्द झाल्यास अनामत रक्कम मिळणार नाही. कार्यक्रम आरक्षित झाल्यानंतर काही कारणास्तव कार्यक्रम रद्द झाला तरी अनामत रक्कम दिली जाणार नाही. कार्यक्रमाच्या परस्पर हस्तांतरणालादेखील नव्या नियमावलीत विरोध करण्यात आला असून, कार्यक्रमाचे हस्तांतरण झाल्यास आता एक हजार ऐवजी २५ हजारांचा दंड आकारला जाणार आहे.  आता तारीख आरक्षित करण्यासाठी प्रथम अनामत रक्कम व भाडे अदा करावे लागणार आहे. कालिदास कलामंदिर व महात्मा फुले कलादालनात आयोजकांकडून अस्वच्छता आढळल्यास दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याशिवाय पाचशे वॅट लाइटसाठी पन्नासऐवजी शंभर रुपये आकारण्याचा प्रस्ताव आहे. इलेक्ट्रिक कामासाठी प्रति प्लग ५० रुपये, रेकॉर्डिंगसाठी प्रति कॅसेटला ५०० रुपये, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या कक्षासाठी ५०० रुपये, अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या कक्षासाठी १०५० रुपये, प्रेक्षागृहातील जाहिरात फलकांवर प्रतिदिन ११० रुपये, व्यावसायिक जाहिरातींसाठी स्वतंत्र कर, कार्यक्रम संपल्यावर ताबा देण्यास उशीर केल्यास दर अर्ध्या तासाला १ हजार रुपयांप्रमाणे दंड भरावा लागणार आहे. 
मुळात कालिदासचे दर पूर्वीप्रमाणेच ठेवावेत, त्यात वाढ करू नये अशी मागणी नाट्य परिषद व रंगकर्मींनी वारंवार मांडली आहे. त्यासाठी निरनिराळ्या माध्यमातून लढाही दिला; मात्र थोडीशी भाडेवाढ कमी करत रडत्याचे डोळे पुसण्यासारखे केले. आताही नियमावलीद्वारे छुपी दरवाढ करण्याचा घाट दिसतो आहे. याबाबत आधी कुणालाच कल्पना दिलेली नाही. अचानक नियमावली समोर आली आहे. कुठलाच रंगकर्मी ती मान्य करणार नाही.
- प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष, नाट्य परिषद, नाशिक शाखा.

Web Title: Hidden ferries through revised rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.