हरणबारी ८९; केळझर ५७ टक्के भरले
By Admin | Updated: August 2, 2016 00:50 IST2016-08-02T00:48:52+5:302016-08-02T00:50:45+5:30
हरणबारी ८९; केळझर ५७ टक्के भरले

हरणबारी ८९; केळझर ५७ टक्के भरले
सटाणा : बागलाण तालुक्यातील धरणांच्या पाणी साठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. प्रकल्पाचे पाणलोटक्षेत्र असलेल्या साल्हेर परिसरात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. सोमवारी हरणबारी ८९ टक्के, तर केळझर ५७ टक्के भरले आहे. दसाणा, पठावा हे लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने हत्ती व कान्हेरी नदीला पाणी आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बागलाण तालुक्यातील हरणबारी, केळझर या मध्यम प्रकल्पांसह दसाणा, पठावा, जाखोड, दोधेश्वर, शेमळी, रातीर हे लघुप्रकल्प तालुक्याची तहान भागवितात. गेल्या वर्षी आॅगस्ट अखेरपर्यंत तालुक्याचा जलसाठा अवघा बारा टक्के होता. यंदा मात्र पावसाने जुलैमध्ये जरी हजेरी लावली असली तरी ती समाधानकारक आहे. या पावसामुळे तालुक्यातील धरणांच्या पाणी साठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. धरणांच्या पाणलोटक्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू असून, ११७२ दसलक्षघनफूट क्षमता असलेल्या हरणबारी धरणात १०४० दशलक्षघनफूट पाणीसाठा आहे. ५७२ दशलक्षघनफूट क्षमतेच्या केळझर धरणात ३२३ दशलक्षघनफूट इतका पाणीसाठा झाला आहे तर हत्ती व कान्हेरी नदीवरील दसाणा, पठावा हे लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने नद्यांना पाणी आले असून, नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. जाखोड, दोधेश्वर या लघुप्रकल्पाच्या साठ्यातही वाढ होऊन प्रकल्प ७६ टक्के भरले आहेत. मात्र शेमळी, रातीर, सुराणे येथील प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत. हा परिसर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असून, पाऊस न झाल्यास पाण्याची भयावह परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.