मार्कंडपिंप्री येथील हेमाडपंथी भुवनेश्वर महादेव मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:16 IST2021-08-23T04:16:47+5:302021-08-23T04:16:47+5:30
श्रावण मासात कळवण तालुक्यातील मार्कंडपिंप्री येथील अतिप्राचीन महाभारत कालीन हेमाडपंथी भुवनेश्वर महादेव मंदिराला महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. शिवभक्त मोठ्या ...

मार्कंडपिंप्री येथील हेमाडपंथी भुवनेश्वर महादेव मंदिर
श्रावण मासात कळवण तालुक्यातील मार्कंडपिंप्री येथील अतिप्राचीन महाभारत कालीन हेमाडपंथी भुवनेश्वर महादेव मंदिराला महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. शिवभक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करतात. श्रावण मासानिमित्ताने अभिषेकासह धार्मिक विधिवत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना मेघाऋषींनी केली आहे. त्यांचे दर्शन घेतल्यास मन:शांती मिळते, निसर्गाच्या कुशीत असलेले हे मंदिर अतिशय अजोड असून दुर्लक्षित आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक अर्धशक्तीपीठ व मार्कंडेय ऋषींच्या तपपर्वतांच्या जवळच मार्कंडपिंप्री या गावात हे शिवमंदिर शेकडो वर्षांपूर्वीचे आहे.
सध्याच्या परिस्थितीत मंदिराची पडझड झालेली असून पूर्णपणे दगडात बांधण्यात आलेले आहे. मंदिरामध्ये गर्भगृह व मंडप असे दोन भाग बांधण्यात आले आहेत. मंडपात एका नंदीची स्थापना केली असून पूर्व दिशेला दहा फूट उंचीचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या स्तंभावरही कोरीव काम केलेले असून ते थोड्या प्रमाणात व सलग दगडावर कोरलेले आहेत. त्याचा आकार अष्टकोनी आहे. अनेक स्तंभांच्या आधारे सभामंडप व गाभा उभा असून स्तंभाची उंची व मजबुती यामुळे प्रवेशद्वार अधिक आकर्षक आहे. मंदिरामध्ये अनेक प्रकारच्या शिंबाचे कोरीव काम केलेले आहे. या मंदिरात असलेल्या शिव पिंडीतून अखंड जलधारा वाहते. या पिंडीखाली मृत्युंजय मंत्राची स्थापना केली आहे. या मंदिरात एक गणपतीची मूर्ती आहे. तसेच येथेच महर्षी मृकुंड व मायावती यांची समाधी आहे. मार्कंडेय ऋषींनी याच भुवनेश्वर महादेव मंदिरात महामृत्यू मंत्राचे अनुष्ठान पूर्ण केले आहे. ते पूर्ण झाल्यावर त्यांनी मार्कंडेय पर्वतावर आपले स्थान ग्रहण करून सप्तशती हा ग्रंथही लिहिला अशी आख्यायिका आहे. (१९ कळवण टेंपल)
190821\241519nsk_60_19082021_13.jpg
मार्कंडपिंप्री येथील हेमांडपंथी भुवनेश्वर महादेव मंदीर.