येवला तलाठी संघटनेकडून वृद्धाश्रमास मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 00:29 IST2021-05-04T00:28:19+5:302021-05-04T00:29:07+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील तलाठी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी स्वतःच्या पगारातील पैसे संकलित करून, १२,५०० रुपयांचा महिन्याभराचा कोरडा शिधा, तसेच औषधोपचारासाठी रोख ५,००० रुपयांची रक्कम तहसीलदार प्रमोद हिले यांच्या हस्ते नवनाथ जराड यांच्याकडे सुपुर्द केली.

शिरसगाव लौकि येथे सैंगऋषी वृद्धाश्रमास मदतीचा हात देताना येवला तलाठी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य.
मानोरी : येवला तालुक्यातील तलाठी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी स्वतःच्या पगारातील पैसे संकलित करून, १२,५०० रुपयांचा महिन्याभराचा कोरडा शिधा, तसेच औषधोपचारासाठी रोख ५,००० रुपयांची रक्कम तहसीलदार प्रमोद हिले यांच्या हस्ते नवनाथ जराड यांच्याकडे सुपुर्द केली.
आजच्या मंदावलेल्या आर्थिक परिस्थितीत येवला तालुक्यातील लौकीशिरस येथील वृद्धाश्रमाला मदत करण्याची गरज असल्याची बाब येवला येथील तलाठी संघटना येवला यांच्या लक्षात आली.
या वृद्धाश्रमात समाजाने नाकारलेले, दिव्यांग, विविध आजाराने ग्रासलेले, स्मृतिभ्रंश झालेल्या वृद्धांना मायेचा आसरा लौकिशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ जऱ्हाड हे देत आहेत. मुळात जराड दाम्पत्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही ते या वृद्धांची सेवा करीत आहेत. त्यांच्या सेवेला हातभार लागावा, म्हणून येवला तालुक्यातील सर्व तलाठी मंडळी यांनी निर्णय घेऊन सदर मदत केली.
याप्रसंगी तलाठी कमलेश पाटील, अतुल थुल, परेश धर्माळे, संदीप काकड, विठ्ठल शिंदे, अश्विनी भोसले, विजय भदाणे ,कमलेश निर्मळ, आकाश कदम, मंडळ अधिकारी चेतन चंदावार, कोतवाल आहेर, कोतवाल मुरकुटे, कोतवाल पिंगळे हे उपस्थित होते.
आपणही एक दिवस वृद्ध होणार असून, असे दिवस कुणावरही येऊ शकतात. आपण या समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून निराधार वृद्धांचा आधार होण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. याचबरोबर, या वृद्धांना श्रावणबाळ योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही तलाठ्यांना दिल्या आहेत.
- प्रमोद हिले, तहसीलदार येवला.