'त्या' खुनाचा उलगडा : गर्भपातासाठी मदतीचा लावला तगादा अन् चुलत भावाने काढला बहिणीचा काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 19:26 IST2020-12-15T19:23:22+5:302020-12-15T19:26:34+5:30
'तु माझा पती बनून माझ्यासोबत डॉक्टरकडे चल आणि गर्भपात करुन आण' असा तगादा मयत जैनब हिने लावला होता.

'त्या' खुनाचा उलगडा : गर्भपातासाठी मदतीचा लावला तगादा अन् चुलत भावाने काढला बहिणीचा काटा
नाशिक : तपोवनातील लक्ष्मीनारायण पुलाच्या अलीकडे रामटेकडीच्या पायथ्याशी मोकळ्या पटांगणात बेवारसपणे आढळून आलेल्या 'त्या' युवतीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना अखेर यश आले आहे. युवतीच्या खूनाचा उलगडा करत पोलिसांनी याप्रकरणी मयत महिलेच्या चुलत भावाला बेड्या ठोकल्या आहे. अनैतिक संबंधातून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
तपोवनाजवळ गोदाकाठालगत निर्जनस्थळी गेल्या शनिवारी (दि.१२) भद्रकाली पोलिसांना एका स्त्री जातीचा मृतदेह बेवारसपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजल्यामुळे पोलिसांना ओळख पटविणे कठीण झाले होते. महिलेच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्लाा केल्यामुळे तीचा मृत्यु झाल्याचे शवविच्छेदन अहवालातुन स्पष्ट झाले होते.याप्रकरणी भद्रकाली पोलीसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाला दिले. वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांनी तत्काळ सहायक निरिक्षक महेश कुलकर्णी, रघुनाथ शेगर यांचे पथक तयार करुन अज्ञात मारेकऱ्याचा व मयत स्त्रीच्या नातेवाईकांचा शोध सुरु केला.
दरम्यान, पोलिसांनी माहिती घेत चाचपणी सुरु करत मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करत देवळालीगावापर्यंतचा माग काढला. देवळालीगावातील महिलेचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचे घर शोधून त्यांच्याद्वारे मृतदेहाची ओळख पटविली. जैनब शाम उर्फ जाकिर कुरेशी या युवतीचा मृतदेह असल्याची पोलिसांना खात्री पटली. देवळाली गावात तपासी पथकाने नातेवाईकांकडे सखोल चौकशी करत तीचा नातेवाईक असलेला चुलत भाऊ संशयित दानिश जावेद कुरेशी (२०,रा. लोहारवाडा, देवळाली गाव) यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविला असता त्याने खुनाच्या गुन्ह्याची प्राथमिक कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी त्यास बेड्या ठोकून पुढील तपासाकरिता भद्रकाली पोलिसांच्या हवाली केले आहे.
तीन महिन्यांची होती गर्भवती
मयत जैनब ही तीन महिन्यांची गर्भवती होती अशी माहिती पोलिसांनी दिली. 'तु माझा पती बनून माझ्यासोबत डॉक्टरकडे चल आणि गर्भपात करुन आण' असा तगादा मयत जैनब हिने लावला होता. यामुळे तिला तपोवन येथील एका जडीबुटी देणाऱ्या वैद्याकडे गर्भपात करण्यासाठी घेऊन जाण्याचा बनाव करत ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजता तिला तपोवन येथे दुचाकीने आणून तिचा गळा आवळला आणि डोक्यात दगड टाकून ठार मारले, अशी कबुली संशयित दानिश याने पोलिसांकडे दिली आहे. अनैतिक संबंधातून जैनबचा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.