कळवणच्या मजुरांना सोलापुरात मिळाली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 00:25 IST2020-04-11T20:42:16+5:302020-04-12T00:25:51+5:30
मनोज देवरे । लोकमत न्यूज नेटवर्क कळवण : देशभरात कोरोनामुळे उद्भवलेली बिकट परिस्थिती आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाउन झाल्यामुळे ऊसतोडणीसाठी आपल्या गावापासून परजिल्ह्यात कोसो दूर गेलेल्या मजुरांना लॉकडाउन संपेपर्यंत आहे त्याच ठिकाणी राहावे लागत असल्याने पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे या मजुरांना पुढील काही दिवस पुरेल इतका किराणा व धान्य उपलब्ध झाल्याने मजुरांच्या उदरभरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

कळवणच्या मजुरांना सोलापुरात मिळाली मदत
कळवण : देशभरात कोरोनामुळे उद्भवलेली बिकट परिस्थिती आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाउन झाल्यामुळे ऊसतोडणीसाठी आपल्या गावापासून परजिल्ह्यात कोसो दूर गेलेल्या मजुरांना लॉकडाउन संपेपर्यंत आहे त्याच ठिकाणी राहावे लागत असल्याने पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे या मजुरांना पुढील काही दिवस पुरेल इतका किराणा व धान्य उपलब्ध झाल्याने मजुरांच्या उदरभरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात ऊसतोडणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून कळवण तालुक्यातील ऊसतोडणी मजुरांच्या काही टोळ्या गेल्या आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून हे मजूर त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. लॉकडाउनमुळे ऊसतोडणीही बंद झाल्याने या मजुरांना आपल्या गावी परतणे शक्य झाले नाही. पंढरपूर तालुक्यात सध्या वास्तव्य करत असलेल्या कळवण तालुक्यातील शिरसा भागातील ऊसतोडणी मजुरांमधील रमेश बर्डे या युवकाने फेसबुकवरून स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राकेश हिरे यांचा मोबाइल नंबर घेत व्हॉट्सअॅपवर एक पत्र पाठवले. हे पत्र हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी बर्डेला फोन करून परिस्थिती जाणून घेऊन कळवणचे तहसीलदार बी. ए. कापसे यांना सदर परिस्थिती सांगून पंढरपूरच्या तहसीलदारांशी संपर्क साधून संबंधित मजुरांना मदत करण्याबाबत सांगावे, अशी विनंती केली.
तहसीलदार कापसे यांनी पंढरपूर येथील तहसीलदारांशी संपर्क करून परिस्थिती सांगितली. पंढरपूरच्या तहसीलदारांनी त्वरित तेथील प्रशासकीय यंत्रणेला सूचना करत संबंधित ऊसतोड कामगारांना मदत करण्याच्या सूचना केल्या.
-----------------
कळवण तालुक्यातील काही ऊसतोड मजूर सोलापूर जिल्ह्यात लॉकडाउनमुळे अडकल्याचे व त्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीची गरज असल्याची माहिती राकेश हिरे यांनी दिल्यानंतर मी पंढरपूरच्या तहसीलदारांशी संपर्क करून संबंधितांना मदत करण्याची विनंती केली. तेथील तहसीलदार व यंत्रणेने त्या मजुरांना सर्वतोपरी मदत केली आहे.
- बी. ए. कापसे, तहसीलदार, कळवण