जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST2021-07-22T04:11:03+5:302021-07-22T04:11:03+5:30
पहाटेपासून सुरू झालेल्या या पावसाने दिवसभर संततधार कायम ठेवल्याने सूर्यदर्शनही होऊ शकले नाही. ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात ...

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
पहाटेपासून सुरू झालेल्या या पावसाने दिवसभर संततधार कायम ठेवल्याने सूर्यदर्शनही होऊ शकले नाही. ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येऊन अनेक नद्या, नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. नाशिक शहरातही पहाटेपासून सुरू झालेला पाऊस दिवसभर कायम होता. त्यामुळे जनजीवनावर त्याचा परिणाम झाला. तसेच अगोदरच कोरोनामुळे ईद सणावर आलेले निर्बंध व त्यात दिवसभर पावसाची रिपरिपमुळे मुस्लीम बांधवांच्या ईदचा आनंदही काहीसा फिका पडला.
चौकट===
अनेक गावांचा संपर्क तुटला
त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी या पावसाच्या माहेरघरी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने अनेक गावांना जोडणाऱ्या मोऱ्या पाण्याखाली गेल्याने दळणवळण यंत्रणा ठप्प झाली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे टाकेदेवगाव येथील गावाला जोडणारे वावीहर्ष व देवगाव येथील रस्त्यातील पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने या गावांचा त्र्यंबकेश्वरशी संपर्क तुटला. त्यामुळे या गावांहून खोडाळाकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्यावर वाहतूक वळविण्यात आली आहे.
पेठ तालुक्यातील मौजे देवीचामाळ येथील खुबेटी नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे देवीचामाळ, वाजवड व वडपाडा या तीन गावांचा संपर्क तुटला आहे.
चौकट===
धरणसाठ्यात वाढ
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणक्षेत्रात सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत ९० मिलीमीटर इतका पाऊस नोंदविला गेल्याने गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात दिवसभर पाऊस सुरूच राहिल्याने गंगापूर समूहात पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांच्या पाणीसाठ्यात कमीअधिक वाढ होण्यास पावसाने मदत झाली आहे.