सलग दुसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस

By Admin | Updated: May 29, 2014 00:29 IST2014-05-29T00:21:15+5:302014-05-29T00:29:39+5:30

रस्ते जलमय : आठवडे बाजार ठप्प; वृक्ष उन्मळून वाहनांचे नुकसान

Heavy rain for the second consecutive day | सलग दुसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस

सलग दुसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस

रस्ते जलमय : आठवडे बाजार ठप्प; वृक्ष उन्मळून वाहनांचे नुकसान
नाशिक : रोहिणी नक्षत्रातील पावसाने आज सलग दुसर्‍या दिवशी वादळीवार्‍यासह हजेरी लावली. यामुळे गंगाघाटावरील आठवडे बाजाराची दैना झाली, तर शहरात आज पुन्हा अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. यात एका ठिकाणी रिक्षाचे, तर काही ठिकाणी दुचाकी वाहनांचे नुकसान झाले.
शहरात मंगळवारी वादळीवार्‍यासह गारांचा पाऊस झाला होता. यात शेकडो वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक चारचाकी व दुचाकी वाहनांचे नुकसान झाले होते, तर झोपडप˜ी परिसरातील घरांचे पत्रे उडाले होते. शेतकर्‍यांच्या पॉली हाऊसचेही मोठे नुकसान झाले होते.
आज पुन्हा दुपारच्या सुमारास रोहिणीच्या पावसाने हजेरी लावली. वादळीवार्‍यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. गंगाघाटावर भरलेल्या आठवडे बाजाराची दैना उडवून दिली. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून रस्ते जलमय झाले होते. यामुळे वाहतुकीची कोंडीही झाली होती.
आज सकाळपासूनच वातावरणात उकाडा असल्याने सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज असताना दुपारीच पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वादळीवार्‍यामुळे शहराच्या मध्यवस्तीच्या ठिकाणची झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या मोडून पडल्या. जोरदार वार्‍यामुळे आज पुन्हा अनेक घरांचे पत्रे हवेत उडाल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. सुमारे तासभर पावसाने मुख्य रस्ते जलमय झाले, तर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून तळ्यांचे स्वरूप आले होते.

पुन्हा तोच कित्ता...
मंगळवारच्या पावसामुळे शहरात शेकडो झाडे उन्मळून पडली होती. मुख्य रस्त्यावरील झाडे हटविण्यात आली असली तरी आज दिवसभर इतर झाडे, फांद्या हटविण्याचे काम अग्निशमन दलाकडून केले जात असतानाच आज दुसर्‍या दिवशीही पुन्हा वादळीवार्‍यासह पावसाने हजेरी लावत पुन्हा झाडे कोलमडली. तपोवनातली काही झाडे पडली, तर सराफ बाजारातील काही ठिकाणी पत्रे उडाल्याने नुकसान झाले. कॉलेजरोडच्या पाटील लेन -२ येथेही झाड कोसळले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत गट कार्यालयासमोरचे झाडही उन्मळून पडले. जुन्या नाशकातील नाईकपुर्‍यात झाडाची फांदी तुटून पडल्याने रिक्षाचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे पंडित कॉलनी, आनंदवली परिसरातही झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.
पाणी तुंबले
सुमारे तासभर झालेल्या पावसाने जागोजागी पाणी तुंबले होते. राजीव गांधी भवन, सराफ बाजार, मेनरोड यांसह उपनगरीय परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते. मुसळधार पाऊस असल्याने भुयारी गटारीही तुंबल्या. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.

Web Title: Heavy rain for the second consecutive day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.