‘गांवकरी’च्या संचालकांच्या जामिनावर ६ मेस सुनावणी
By Admin | Updated: April 16, 2016 22:37 IST2016-04-16T22:29:34+5:302016-04-16T22:37:31+5:30
३४४ तक्रारी : अंतरिम अटकपूर्व जामिनास ६ मेपर्यंत मुदतवाढ

‘गांवकरी’च्या संचालकांच्या जामिनावर ६ मेस सुनावणी
नाशिक : मुदतठेवींवर आकर्षक व्याजाचे आमीष दाखवून मुदतीनंतरही गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची रक्कम व व्याज देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल असलेले ‘गांवकरी’ प्रकाशनचे संचालक अरविंद पोतनीस व वंदन पोतनीस या दोघांच्याही अंतरिम अटकपूर्व जामिनास न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी मंगळवारी (दि़ १२) ६ मेपर्यंत मुदतवाढ दिली़ आतापर्यंत ‘गांवकरी’च्या ३४४ ठेवीदारांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या असून, फसवणुकीची रक्कम सुमारे साडेसहा कोटींच्या पुढे गेली आहे़ दरम्यान, गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा आराखडा पोतनीसांनी न्यायालयास सादर केला आहे़
न्यायालयाने पोतनीस पिता-पुत्रांना काही अटी व शर्तींवर १२ एप्रिलपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला होता़ त्यानुसार न्यायालयात मंगळवारी झालेल्या युक्तिवादात सरकारी वकील अॅड़ राजेंद्र घुमरे यांनी सांगितले की, सरकारवाडा पोलिसांकडे आतापर्यंत ३४४ ठेवीदारांनी तक्रारी केल्या असून रक्कम साडेसहा कोटींच्या पुढे पोहोचली आहे़
गांवकरीच्या संचालकांनी आराखड्यात परतफेडीसाठी तीन वर्षांचा कालावधी मागितला असून या आराखड्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे़ तर पोतनीसांच्या वकिलांनी काही गुंतवणूकदारांना पैसे परत केल्याचे सांगितले असता न्यायालयाने यादी सादर करण्यास सांगितले़
वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने ५ मेपर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारी व फसवणुकीची एकत्रित माहिती देण्याचे आदेश पोलिसांना दिले व ६ मे रोजी पोतनीस पिता-पुत्रांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार असल्याचे सांगितले़
यावेळी २९ ठेवीदारांनी पोतनीसांच्या जामिनास विरोध असल्याचे न्यायालयात सांगितले़ गांवकरीमध्ये ठेवी ठेवलेल्या १०४६ ठेवीदारांची २५ कोटी ७७ लाख ६४ हजार २७९ रुपयांची परतफेड बाकी आहे़
येत्या ६ मे रोजी न्यायालयात सादर केलेला आराखडा व जामिनावर सुनावणी होणार आहे़ या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (प्रतिनिधी)