पाथर्डी फाटा परिसरात डंपरच्या धडकेत आरोग्य कर्मचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST2020-12-05T04:21:49+5:302020-12-05T04:21:49+5:30
इंदिरानगर : पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटा रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. डंपरचालकाला पोलिसांनी अटक ...

पाथर्डी फाटा परिसरात डंपरच्या धडकेत आरोग्य कर्मचारी ठार
इंदिरानगर : पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटा रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. डंपरचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात महापालिकेचा आरोग्य कर्मचारी अजय तारसर यांचा मृत्यू झाल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे.
अजय सुभाष तारसर (२९, रा. गोपालवाडी, वडाळागाव) हे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कार्यालयात जाण्यासाठी पाथर्डी फाट्याकडे दुचाकीवरून (क्र. एमएच १५ डीएफ ७८०९) जात असताना पाथर्डी फाट्याकडून येणाऱ्या डंपरने (क्र. एमएच १५ एफव्ही ८००१) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तारसर यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी डंपरसह चालकाला ताब्यात घेतले असून, इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इन्फो-
अपघाताची माहिती मिळताच महापालिकेचे सभागृह नेते सतीश सोनवणे, नगरसेवक भगवान दोंदे, सुदाम ढेमसे, विभागीय अधिकारी मयूर पाटील, अशोक दोंदे, कामगार युनियनचे सुरेश मारू आदींनी अपघातस्थळी धाव घेतली, यावेळी जमलेलेल्या नागरिकांनी संबंधित लोकप्रतिनिधींकडे या भागातील अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर दुभाजक बांधण्याची मागणी केली. त्यावर संबंधित रस्त्याच्या कामात दुभाजकांसाठी मर्यादित निधी असल्याचे समोर आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. अखेर सभागृहनेता सतीश सोनवणे यांनी महापौर आणि आयुक्तांसोबत चर्चा करून दुभाजकाचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने नागरिकांचे समाधान झाले.
(आरफोटो-०४अजय तारसर, ०४ ॲक्सिडेंट)