हॉकर्स झोनला लागेना मुहूर्त
By Admin | Updated: June 11, 2017 00:41 IST2017-06-11T00:41:15+5:302017-06-11T00:41:24+5:30
नाशिक : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत तयार केलेल्या हॉकर्स झोनच्या आराखड्याला महापालिका महासभेची मंजुरी मिळण्यास येत्या १६ जूनला वर्ष होणार आहे

हॉकर्स झोनला लागेना मुहूर्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत तयार केलेल्या हॉकर्स झोनच्या आराखड्याला महापालिका महासभेची मंजुरी मिळण्यास येत्या १६ जूनला वर्ष होणार आहे. परंतु, अद्याप हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीला मुहूर्त लाभू शकलेला नाही. हॉकर्स झोनच्या नावाखाली मात्र रस्त्यावरील फेरीवाल्यांची अतिक्रमणे हटविण्यास प्रशासनाकडून नकार दर्शविला जात असल्याने रस्त्यांवरील वाहनकोंडी नित्याचीच बनली आहे.
राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने सुमारे दोन वर्षे आराखड्यावर काम करत २३९ फेरीवाला क्षेत्र निश्चित केले. आराखड्यानुसार, मुख्य रस्ते, चौक तसेच जास्त रहदारीच्या ठिकाणी फेरीवाल्यांना मनाई केली आहे. फेरीवाला क्षेत्र निश्चितीमुळे शहरातील सुमारे साडेनऊ हजार विक्रेत्यांना हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. शहरात ८३ ठिकाणे ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहेत. १७३ ठिकाणी मुक्त फेरीवाला क्षेत्र, तर ६६ ठिकाणी टाइम झोन निश्चित करण्यात आले आहेत. महापालिकेकडे ९६२० फेरीवाल्यांची नोंदणी झालेली आहे. या सर्व नोंदणीकृत विक्रेत्यांना जागांचे वाटप केले जाणार होते. महापालिकेचे तत्कालीन उपआयुक्त दत्तात्रेय गोतिसे यांनी हॉकर्स झोनचा सर्वसमावेशक आराखडा तयार केला आणि १६ जून २०१६ रोजी प्रस्तावित हॉकर्स झोनला महासभेने दुरुस्ती-सूचनांसह मंजुरी दिली. दुरुस्ती-सूचनांसह आराखडा अंमलबजावणीसाठी तयार असतानाच गोतिसे हे सेवानिवृत्त झाले आणि हॉकर्स झोनची सूत्रे उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांच्याकडे आली.