चटकदार, कडू-गोड कॉलेजस्मृतींचा अड्डा आता होणार इतिहासजमा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST2021-02-05T05:46:10+5:302021-02-05T05:46:10+5:30
नाशिक : कोणत्याही कॉलेजमधील सर्वाधिक ‘हॅपनिंग’ क्षेत्र जर कोणते असेल तर ते असते कॉलेजचे कॅन्टीन. कॉलेजचे गॅदरींग, पिकनिकचे बेत, ...

चटकदार, कडू-गोड कॉलेजस्मृतींचा अड्डा आता होणार इतिहासजमा !
नाशिक : कोणत्याही कॉलेजमधील सर्वाधिक ‘हॅपनिंग’ क्षेत्र जर कोणते असेल तर ते असते कॉलेजचे कॅन्टीन. कॉलेजचे गॅदरींग, पिकनिकचे बेत, लेक्चर बंकचा आणि चकाट्या पिटण्याचा अड्डा, मित्र-मैत्रिणींच्या भेटीचा हक्काचा स्पॉट, पहिल्या प्रेमाच्या आणि त्याचा शेवट झाल्याच्या, यारीदोस्तीच्या आणाभाका आणि दुष्मनीतील खुन्नस काढण्याच्या सर्व कडू-गोड स्मृतींचा आणि आयुष्यभर मनात तरंगत राहणाऱ्या आठवणींचा अड्डा असतो कॉलेजचे कॅन्टीन. गोएसोत शिकलेल्या प्रत्येक नाशिककरांच्या स्मृतीत विशेष स्थान असलेले आणि गत सहा दशकांहून अधिक काळ युवक-युवतींच्या भावभावनांचे साक्षीदार असलेले हे एचपीटी, बीवायके, आरवायकेचे कॅन्टीन येत्या आठवडाभरात इतिहासजमा होणार आहे.
ज्या कॉलेज कॅन्टीनमध्ये कुणाला कापायचे, कुणाची जिरवायची, कुणाची खेचायची, कुणाला झाडावर चढवायचे, कुणाला संध्याकाळी धुऊन काढायचे, कुणाला निवडून आणायचे, कुणाला पाडायचे, कुणासोबत ‘टाईमपास’ करायचा, कुणासमवेत ‘मेड फॉर इच अदर’च्या आणाभाका घेतल्या जायच्या. त्या सहा दशकातील सर्व स्मृती ज्या भिंतींनी कानाने ऐकल्या आणि तिच्या मनातच साठवून ठेवल्या त्या आता कालौघात जीर्ण होऊन खचल्या आहेत. तसेच या परिसरात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या पुस्तक प्रदर्शनासाठी जागा अपुरी पडू नये, म्हणून कॉलेज कॅन्टीनबरोबरच आसपासच्या परिसरातील तीन जीर्ण इमारती पाडल्या जात आहेत. कॅन्टीनच्या या जागेत प्रारंभी केवळ चहा आणि बटाटावडा मिळायचा. त्यानंतर प्रदीर्घ काळ वडापाव आणि कांदाभजीने कॅन्टीनवर हुकुमत गाजवली. तर गत दोन दशकात वडारस्सा आणि मिसळचे प्रस्थ वाढले. त्या कॅन्टीनची चव काळानुरुप आणि तेथील कॅन्टीनचालकांच्या बदलानुरुप बदलत गेली असली तरी त्या कॅन्टीनच्या स्मृती गत पाच दशकांतील विद्यार्थ्यांच्या मनात आजही ताज्या आहेत.
इन्फो
राष्ट्रवादीचे प्रमुख नेते माजी आमदार हेमंत टकले यांच्या कॅन्टीनच्या स्मृती जाग्या झाल्या. साधारण पाच दशकांपूर्वी केवळ बटाटावडा आणि त्याबरोबर ताकातील चटणी मिळायची ही त्यांची आठवण होती. त्यापूर्वीही त्या जागेत बसणाऱ्या पेरुवाल्या मावशीच्या आठवणीदेखील त्यांना आहेत. त्या पेरुवाल्या मावशी मग काही काळानंतर प्रेमवीरांच्या निरोपाचे हक्काचे ठिकाण झाल्याची आठवणदेखील त्यांनी सांगितली. तर कॉलेजजीवनापासून प्राध्यापक म्हणून चार दशकांहून अधिक काळ कॉलेजशी घनिष्ट संपर्क असलेल्या प्रा. दिलीप फडके सर यांनी तेथील कॉन्ट्रॅक्टर बाबूभाई ते वेटर थॉमसपर्यंतच्या आठवणींचा पट उलगडला. त्यावेळी कॅन्टीनमध्ये केवळ चहा, क्रिमरोल,डोनट, बटाटावडा आणि वडापाव मिळायचा. त्यावेळी कॅन्टीनमध्ये जाणं हीच फॅन्टसी होती. लेक्चर बंक करून बसण्याची आणि ज्या काळात मुला-मुलींनी एकमेकांशी बोलणेदेखील अशक्य असायचे, त्या सर्व घटना घडामोडींचे केंद्र हे कॅन्टीनच असल्याची आठवणदेखील प्रा. फडके यांनी काढली. तर प्रा. येवलेकर सर यांनी माजी आमदार डॉ. वसंत पवार यांची कॉलेज कॅन्टीनशी निगडीत आठवण सांगितली. ‘नॅक’ समितीसमोर माजी विद्यार्थी म्हणून आलेल्या डॉ. वसंत पवार यांनी त्यांच्या कॉलेजजीवनाच्या आठवणी जागवण्यासाठी सर्व मित्रांसमवेत वडा खाऊन आठवणी जागवल्याचे प्रा. येवलेकर यांनी नमूद केले.
इन्फो
चहा ५ पैसे, वडा १० पैसे, सिगरेट २ पैसे
साधारण १९६० सालच्या आधी सुरू झालेले हे कॅन्टीन त्यानंतरच्या ६० वर्षांतील किमान १२ कॉलेजपिढ्यांचे गुपीत मनात राखून आहे. १९६५ ते ७० च्या काळात या कॅन्टीनमध्ये चहा ५ पैसे, वडा १० पैसे दर होता. त्याकाळी तेथील वेटर थॉमस हा त्याच्या खिशात ठेवलेल्या सिगरेट २ पैशांना विकायचा. त्यामुळे जुन्या काळातील तसेच त्यानंतरच्या काळातही अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली सिगरेटदेखील त्याच कॅन्टीनच्या मागील भागात जाऊन ओढल्याच्या आठवणीदेखील अनेकांच्या मनात आहेत.
फोटाे
२८कॅन्टीन