शाही मिरवणुकीत आशीर्वचनाची आनंदवृष्टी

By Admin | Updated: September 13, 2015 21:43 IST2015-09-13T21:38:04+5:302015-09-13T21:43:08+5:30

नाशकात धर्मरक्षणाची ग्वाही: ‘जय श्रीराम’च्या जयजयकाराने दुमदुमली रामनगरी

Happy Anniversary of the royal procession | शाही मिरवणुकीत आशीर्वचनाची आनंदवृष्टी

शाही मिरवणुकीत आशीर्वचनाची आनंदवृष्टी

नाशिक : सोन्या-चांदीच्या मखरात स्थानापन्न झालेल्या इष्टदेवतांबरोबरच साधू-महंत आणि छत्र चामरे घेऊन निघालेले अनुयायी या ऐश्वर्य संपन्न परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या शाही मिरवणुकीने अवघ्या जगभरातील भाविकांचे लक्ष वेधले. ध्वजपताका अखंडपणे खांद्यावर घेऊन वावरणाऱ्या आणि पारंपरिक शस्त्रांचे दर्शन घडविणाऱ्या धर्मरक्षकांमुळे हिंदू धर्माच्या चिररक्षणाची ग्वाही दिली. रस्त्याच्या दुतर्फा असलेले हजारो भाविक या संत-महंतांच्या दर्शनाने कृतकृत्य होऊन नतमस्तक झाले. महंतांनी त्यांच्यावर आशीर्वचनाची आनंदवृष्टी केली.
निमित्त होते ते कुंभमेळ्यातील दुसऱ्या पर्वणीतील ‘शाही’ मिरवणुकीचे! साधुग्राममधून सकाळी ६ वाजता निघालेल्या या मिरवणुकीने डोळ्यांचे पारणे फेडले बारा वर्षांनंतरचा हा सोहळा हजारो भाविकांनी डोळ्यात साठविला.
श्रावणी अमावस्येच्या सुमुहूर्तावर होणाऱ्या पर्वणीसाठी साक्षात साधू-महंतही आतुर होते. मध्यरात्रीपासून साधुग्राममध्ये मिरवणुकीची तयारी सुरू होती. पुष्पमाला आणि विद्युत रोषणाई केलेल्या मोटारींवर इष्टदेवतांसह साधू-महंतांसाठी केलेले मखरही वैशिष्टपूर्ण होती. पुष्पमालांची आभूषणे परिधान केलेल्या साधूंची लगबग सुरू होती. मध्यरात्री सुरू झालेल्या वाद्यवृंदांनी साधुग्रामची सुरेल पहाट उगवली.
सर्वप्रथम अखिल भारतीय श्री पंच निर्मोही निर्मल आखाडा आणि त्यापाठोपाठ त्यांचे खालसे, तर त्या पाठोपाठ अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा तसेच अखेरीस पाठोपाठ निर्वाणी आखाडा आणि त्यांचे खालशे अशी मिरवणूक सकाळी ठीक ६ वाजता सुरू झाली आणि दुसऱ्या पर्वणीचा खऱ्या अर्थाने श्री गणेशा झाला. महंत सुखदेवदास यांच्या दिशादर्शनाखाली सुरू झालेल्या निर्माेहीच्या आखाड्याच्या प्रारंभी उंटस्वाराने हाती घेतलेली धर्मध्वजा आणि मिरवणुकीची वर्दी देणारे नगारा वादन करणारे साधू त्या पाठोपाठ आखाड्यांचे निशान आणि त्यामागे इष्टदेवता घेऊन रथावर आरूढ श्री महंत अशा प्रकारे लक्ष्मीनारायण मंदिरापासून मिरवणुकीला ‘जय श्रीराम’च्या जयघोषात प्रारंभ झाला आणि रामकुंडावर पोहाचेपर्यंत तो कायम होता.
ढोल-ताशांच्या गजरात नाचणारे साधू आणि भाविक, दांड पट्टा, चक्री, तलवारी, त्रिशुलांचे खेळ करणाऱ्या साधू-महंतांबरोबर स्थानिक पथकांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले तर शंख, तुतारींबरोबरच ओम नमो नम:शिवाय, देवकीनंदन गोपाला, साई राम ओम साईराम अशा धार्मिक गीतांनी भारलेल्या वातावरणाची अनुभूती दिली. केवळ साधू-महंतच नव्हे तर त्यांचे अनेक अनुयायी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या दुर्लभ मिरवणुकीला पाहण्यासाठी आतुरलेल्या भाविकांनी मिरवणूक मार्गावर दुतर्फा केलेली गर्दी केली आणि मिरवणुकीतील साधू-महंतांवर पुष्पवृष्टी करतानाच ते नतमस्तक होत होते. अनेक महंतांनी प्रसादपुष्पे देऊन भाविकांना आशीर्वचनही दिले. अनेक भाविकांनी तर साधू-महंतांच्या पदकमल पडलेल्या जागेवरील धूळही आपल्या भाळी लावली आणि पुनित झाल्याची भावना व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Happy Anniversary of the royal procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.