ध्वजावरील हनुमानाची गगनभरारी!

By Admin | Updated: August 12, 2015 00:08 IST2015-08-12T00:04:45+5:302015-08-12T00:08:33+5:30

रामायणातील श्लोकांच्या आधारे पारंपरिक चित्रात बदल

Hanuman Gagan Bharari on the flag! | ध्वजावरील हनुमानाची गगनभरारी!

ध्वजावरील हनुमानाची गगनभरारी!

ध्वजावरील हनुमानाची गगनभरारी!नाशिक : साधुग्राममध्ये फडकावल्या जाणाऱ्या ध्वजावरील हनुमानाच्या पारंपरिक चित्रात यंदा बदल करण्यात आला आहे. मागील कुंभमेळ्यात तिन्ही अनी आखाड्यांच्या ध्वजांवर हातात डोंगर असलेल्या उभ्या हनुमानाची छबी होती. यंदा मात्र या हनुमानाने गगनभरारी घेतली आहे. वाल्मीकी व तुलसी रामायणातील काही श्लोकांचा आधार घेत हा बदल केल्याचे सांगितले जात आहे.
कुंभमेळ्यात आखाड्यांच्या ध्वजारोहणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिन्ही प्रमुख आखाड्यांच्या वतीने शाहीस्नानाची तारीख जवळ आल्याची द्वाहीच ध्वज फडकावून दिली जाते. येत्या १९ आॅगस्ट रोजी साधुग्राममध्ये ध्वजारोहण सोहळा होणार आहे. दिगंबर अनी, निर्मोही अनी व निर्वाणी अनी अशा तिन्ही आखाड्यांमध्ये मुख्य महंतांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाणार आहे. दिगंबर आखाड्याचा ध्वज पंचरंगी, निर्मोही आखाड्याचा पांढरा, तर निर्वाणी आखाड्याचा ध्वज लाल रंगाचा असणार आहे. या ध्वजांवर तिन्ही आखाड्यांची इष्टदेवता असलेली हनुमानाची छबी असते. मागील कुंभमेळ्यात ध्वजांवर हातात डोंगर घेऊन उभ्या असलेल्या हनुमानाचे चित्र होते. यंदा मात्र हाती डोंगर घेऊन हवेत उडणाऱ्या हनुमानाची प्रतिमा साकारण्यात आली आहे.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी हा बदल केल्याचे सांगितले जाते. त्यांनी वाल्मीकी व तुलसी रामायणातील काही श्लोकांचा अभ्यास केला. त्यांत हवेत उडणाऱ्या, संकटमोचक, सुवर्णकांती असलेल्या हनुमानाचे वर्णन आले आहे. पुढील महिनाभर कुंभमेळा निर्विघ्न पार पडावा, ध्वजावरील इष्टदेवतेची चौफेर नजर राहावी, यासाठी उभ्या छबीऐवजी संकटमोचक हनुमानाची प्रतिमा ध्वजावर साकारण्याचा निर्णय महंत ग्यानदास यांनी घेतला. त्यानुसार मुंबईतील राजूभाई पोद्दार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुद्ध रेशमी धाग्यात तिन्ही ध्वजांवर दोन्ही बाजूंनी ही छबी साकारली आहे. येत्या १९ तारखेस तिन्ही आखाड्यांत हेच ध्वज फडकवले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
 

Web Title: Hanuman Gagan Bharari on the flag!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.