संतप्त महिलांचा घोरवड ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 17:21 IST2019-01-31T17:20:44+5:302019-01-31T17:21:05+5:30
सिन्नर तालुक्यातील घोरवड येथे गेल्या महिन्याभरापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घोरवडसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडीत करण्यात आला असून गावातील सार्वजनिक विहिरीने तळ गाठल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून रोष व्यक्त केला.

संतप्त महिलांचा घोरवड ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा
बोरखिंड धरणातून घोरवडसह पाच गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. सदर योजना महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या ताब्यात आहे. या योजनेचे अद्याप हस्तांतर झाले नाही. जलवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने गेल्यावर्षी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या निधीतून अपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली. मात्र वीज थकबाकीमुळे गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात योजनेचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. त्यानंतर गावातील सार्वजनिक विहिरीतील पाण्यावर नळपाणीपुरवठा योजना सुरु ठेवण्यात आली होती. मात्र आता सार्वजनिक विहिर आटल्याने ग्रामस्थांना घोरवडसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेची गरज निर्माण झाली आहे. पूर्ण थकबाकी भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करण्यास वीज वितरण कंपनी तयार नाही. योजना मजीप्राच्या ताब्यात असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून योजना आमच्या ताब्यात नसल्याचे सांगते. यातील गावे या योजनेचे हंगामी म्हणजे उन्हाळ्यात पाणी वापरते. आता सार्वजनिक विहिंर आटल्याने टंचाई निर्माण झाली आहे. घोरवड गावातील नळ पाणी योजना सुमारे २० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून रोष व्यक्त केला. यावेळी सविता हगवणे, चंद्रभागा लोहकरे, सुमन हगवणे, लक्ष्मी लोहकरे, पुष्पा हगवणे, कल्याबाई लहामटे, सत्यभामा हगवणे, शांताबाई तळपे, मंदा हगवणे, शारदा हगवणे, यमुना हगवणे, कमलाबाई भुजबळ, संगिता मंडलिक, सुमन लहामटे, पूजा सोनुसे, सविता लहामटे, यशोदा म्हसाळ, पार्वताबाई बामणे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.