नाशकात मेनरोडसह भद्रकालीत व्यापा-यांच्या अतिक्रमित बांधकामांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 14:52 IST2017-12-27T14:48:40+5:302017-12-27T14:52:47+5:30
महापालिकेची कारवाई : व्यावसायिकांनी केलेले वाढीव बांधकाम, शेडस् हटविले

नाशकात मेनरोडसह भद्रकालीत व्यापा-यांच्या अतिक्रमित बांधकामांवर हातोडा
नाशिक - महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी (दि.२७) मेनरोडसह भद्रकाली परिसर, नेहरू चौक, चांदवडकर लेन या भागात व्यापारी-व्यावसायिकांनी दुकानासमोर केलेल्या वाढीव बांधकामांसह शेडस् हटविण्याची कारवाई केली. महापालिकेने प्रस्तावित हॉकर्स झोनमधीलही अतिक्रमित टप-या हटविल्या.
शहरातील मध्यवर्ती भागात प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोडसह भद्रकाली परिसर, नेहरू चौक, चांदवडकर लेन, धुमाळ पॉर्इंट या परिसरात रस्त्यावरील फेरीवाल्यांबरोबरच स्थानिक व्यापारी-व्यावसायिकांनीही आपल्या दुकानांसमोर अतिक्रमण केल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. बव्हंशी व्यापारी-व्यावसायिकांनी दुकानाच्या फलकासमोर पत्र्याचे शेड तसेच दुकानासमोर माल लावत अतिक्रमण केल्याने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. पादचा-यांनाही या रस्त्यांतून मार्ग काढणे अवघड होऊन बसले होते. काही व्यावसायिकांनी तर फेरीवाल्यांना आपल्या दुकानांसमोर जागा देत त्यांच्याकडून भाडे वसुलीही सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. काही दिवसांपूर्वीच भद्रकालीतील अब्दुल हमीद चौक परिसरात थेट रस्त्यावरच दुकाने थाटली गेल्याने स्थानिक व्यावसायिकांनी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या पश्चिम आणि पूर्व विभागाने बुधवारी (दि.२७) संयुक्तरित्या अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली. भद्रकाली परिसरापासून मोहीमेस सुरूवात करण्यात आली. त्यानंतर नेहरुचौक ते धुमाळ पार्इंट दरम्यान मोहीम राबवत व्यापारी-व्यावसायिकांनी उभारलेले शेड हटविण्यात आले. रस्त्यालगत काही विक्रेत्यांच्या टप-याही हटविण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी पश्चिमचे विभागीय अधिकारी नितीन नेर आणि पूर्वच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे ३५ कर्मचारी पोलिस बंदोबस्तासह मोहीमेत सहभागी झाले होते.
मातंगवाड्यातील टप-या हटवल्या
महापालिकेने फेरीवाला धोरणांतर्गत हॉकर्स झोन निश्चित केले आहेत. मातंगवाडा येथे हॉकर्स झोनमध्ये असलेल्या टप-या हटविण्याची कारवाई यावेळी करण्यात आली. तसेच प्रभात थिएटरमागील महापालिकेच्या गाळ्यांभोवती करण्यात आलेल्या वाढीव बांधकामांवरही जेसीबी चालविण्यात आला.