पर्यटनासाठी ‘नाशिक ट्रेकिंग’ पुस्तक मार्गदर्शक : पाळंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:09 IST2018-07-29T23:37:06+5:302018-07-30T00:09:35+5:30
नाशिक ट्रेकिंग हे पुस्तक म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पर्यटनासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. संजय अमृतकर यांनी गिरीशिखरे धुंडाळून पर्यटकासाठी हे पुस्तक आणले आहे, त्याचा उपयोग ट्रेकर्सने अवश्य करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ गिरीतज्ज्ञ आनंद पाळंदे यांनी केले.

पर्यटनासाठी ‘नाशिक ट्रेकिंग’ पुस्तक मार्गदर्शक : पाळंदे
नाशिक : नाशिक ट्रेकिंग हे पुस्तक म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पर्यटनासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. संजय अमृतकर यांनी गिरीशिखरे धुंडाळून पर्यटकासाठी हे पुस्तक आणले आहे, त्याचा उपयोग ट्रेकर्सने अवश्य करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ गिरीतज्ज्ञ आनंद पाळंदे यांनी केले. छायाचित्रकार संजय अमृतकर लिखित नाशिक ट्रेकिंग या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी पाळंदे बोलत होते. उंटवाडी येथील द इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सच्या अशोका सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, अशोका बिल्डकॉनचे संचालक आशिष कटारिया, ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ गिरीश टकले, हरिश बैजल, एम. जी. गोंदिया, आशुतोष राठोड उपस्थित होते. पाळंदे पुढे म्हणाले की, सह्याद्रीच्या गिरीडोंगरातून फिरताना या पुस्तकाचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. म्हणाले की, नाशिक ट्रेकिंग या पुस्तकात नाशिकमधील प्रत्येक ठिकाणची विशिष्ट माहिती देण्यात आली आहे. नाशिक परिसरात अनेक धरणे आहेत, तसेच बॅक वॉटरदेखील आहेत. याचा पर्यटनस्थळ म्हणून आपण विकास करू शकतो. आउटडोअर हे अॅप खूप महत्त्वाचे आहे. एखाद्या ठिकाणी कसे जायचे, या सर्व प्रश्नांची उत्तरे या अॅपमधून आपल्याला मिळू शकतील. कार्यक्र मादरम्यान नाशिक ट्रेकिंग या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन आणि नाशिक आउटडोअर या अॅपचे लाँचिंग मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संजय अमृतकर यांनी प्रास्ताविकातून मनोगत व्यक्त केले. आशिष कटारिया यांनी अॅपसंदर्भात माहिती दिली.