गटनेता बदलाचा मुहूर्त मंगळवारी?
By Admin | Updated: November 22, 2014 23:48 IST2014-11-22T23:47:58+5:302014-11-22T23:48:22+5:30
राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक

गटनेता बदलाचा मुहूर्त मंगळवारी?
नाशिक : जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अंतर्गत खदखद सुरूच असून, त्याबाबत समन्वय साधून चर्चा करण्यासाठी तसेच नियोजित गटनेता बदलासाठी येत्या मंगळवारी (दि.२५) राष्ट्रवादी भवनात जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी कॉँग्रेस सदस्यांची बैठक बोलविण्यात आल्याचे वृत्त आहे. याच बैठकीत जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचा नवीन गटनेता निवडण्यात येणार असून, तीनवेळा निवडून आलेले व अनुभवी कळवणचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक रवींद्र देवरे यांची निवड अपेक्षित मानली जात आहे. रवींद्र देवरे यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेत बांधकाम व अर्थ समिती सभापती म्हणून कामकाज केले आहे. उपाध्यक्ष पद मिळाल्याने विद्यमान गटनेते प्रकाश वडजे यांनीही गटनेते पदाचा राजीनामा देण्याची मानसिकता केली असून, काही दिवसांपूर्वीच झालेल्या माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या उपस्थितीतच गटनेता बदलाची मागणी काही सदस्यांनी केल्यानंतर त्यांनी लगेचच गटनेता बदलाला संमती देत नवीन गटनेता कोणाला करायचे याबाबत त्यावेळी चर्चा केली असता गोरख बोडके व रवींद्र देवरे या दोघांची नावे समोर आली होती. त्यावेळी बोडके यांनी अनुभवी रवींद्र देवरे यांनाच गटनेता करण्याची सूचनाही केली होती. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी कॉँग्रेस भवनात होणारी जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नवीन गटनेता म्हणून रवींद्र देवरे यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. गटनेता बदलाला त्यामुळे मंगळवारचा मुहूर्त लाभल्याची चर्चा जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांमध्ये आहे.(प्रतिनिधी)